गेल्या 30 जुलैला बोरीवलीच्या गोराई परिसरातील भाजी मंडईत एका भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. दोन सराईत गुन्हेगारांनी ही मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला होता.त्यामुळे भाजी विक्रेत्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अक्षय पाटील आणि सागर पाटील या दोन तरूणांना अटक केली होती. या दोन्ही आरोपींवर गोराई परिसरात दहशत पसरवण्याचा आणि खंडणी वसूल करण्याचा आरोप होता.
advertisement
या आरोपींची दहशत कमी करण्यासाठी आणि माज उतरवण्यासाठी पोलिसांनी त्यांची धिंड काढण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भातला व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत आरोपी मस्त पोलिसांसोबत गप्पा टप्पा मारत चालताना दिसत आहेत. आणि आरोपी कमी मित्र असल्यासारखे वाटतायत. तसेच दोन्ही आरोपींच्या चेहऱ्यावर मोठं हास्य आहे.तसेच आपण केलेल्या गुन्ह्याचा थोडा देखील पश्चाताप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे.त्यामुळे ही धिंड आहे की पाहूणचार असा सवाल आता नागरीक उपस्थित करत आहेत.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार पिडीत 53 वर्षीय भाजी विक्रेता हा गेल्या 4 वर्षापासून बोरीवलीच्या गोराईत भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा. नेहमीप्रमाणे तो सकाळी भाजीविक्री करत असताना एक इसम त्याच्याजवळ आला आणि त्याने मला फुलविक्री करायची आहेत, तु दुसरीकडे धंदा लाव असे सांगितले. त्यानंतर पीडित भाजी विक्रेत्याने मला मी 4 वर्षापासून इथे भाजीविक्री करतो त्यामुळे तु दुसरीकडे जाऊन फुल विकं, असे सांगताच तो फुल विक्रेता निघून गेला.
यानंतर फुलविक्रेता त्याच्यासोबन दोन जणांना घेऊन आला आणि त्याने पिडिताची भाजी फेकून दिली. त्यानंतर त्यांच्यातील एका तरूणाने भाजी विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी देत वजन काटा उचलून त्याच्या खांद्यावर मारला. त्यानंतर भाजेविक्रेत्याच्या पाठीवर प्लास्टीक कॅरेटनेही मारहाण करण्यात आली.साधारण दोन-तीन जण मिळून एकट्या भाजीविक्रेत्याला मारहाण करत होते. यानंतर भाजी विक्रेत्याने देखील हात बुक्क्यांनी हल्ला सूरू केला होता. या घटनेमुळे जागेवरून मोठा राडा झाला होता.
यावेळी घटनास्थळी असलेल्या अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद केला होता. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल होताच युवकांनी पळ काढला होता.याप्रकरणी भाजी विक्रेत्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून गोराई परिसरात दहशत पसरवण्याचा आणि खंडणी वसूल करण्याचा आरोप असलेल्या अक्षय पाटील आणि सागर पाटील यांच्याविरुद्ध मुंबई बोरिवली पोलिसांनी खून करण्याचा प्रयत्न, दंगल आणि हल्ला या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक झाली होती.