मुंबई: मराठा आरक्षणासाठीच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृ्त्वातील भगवं वादळ आझाद मैदानात धडकलं. मोठ्या संख्येने आलेल्या मराठा आंदोलकांमुळे मु्ंबईतील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. ऐन सकाळीच मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला आहे. मुंबई महापालिका, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर मराठा आंदोलकांच्या गर्दीने फुल पॅक झाला. तर, दुसरीकडे पोलिसांना न जुमानता वाहने मराठा आंदोलकांनी आझाद मैदान परिसरात आणण्याचा प्रयत्न केल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.
advertisement
राज्यातून जवळपास साडेसहा हजारांहून अधिक गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. त्यामुळं मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मुंबईतील ईस्टर्न फ्री वेवर वाहतूक कोंडी झाली. त्याशिवाय, जे जे उड्डाणपूल आणि इतर ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शीव-पनवेल महामार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलकांच्या वाहनांसाठी कॉटन ग्रीन, वाडीबंदर अशा विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. आझाद मैदानापासून पार्किंगची व्यवस्था ही 3 किमीच्या अंतरात आहे. पोलिसांनी वाशीमध्ये मराठा आंदोलकांच्या वाहनांना अटकाव केला आहे. त्यामुळे अनेकजणांनी रेल्वेतून आझाद मैदान गाठले आहे.