जमाव जमवला अन्...
नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खान याने चिथावणी दिल्याने जमाव आक्रमक झाला आणि दंगल उसळली असल्याचा आरोप आहे. त्याने बेकायदेशीरपणे जमाव जमवला होता, असे पोलिसांनी एफआयआरमध्ये म्हटले. त्यानंतर आता, फहीम खानने यापूर्वीही असाच प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. नागपूर इथल्या दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान यानं तीन वर्षांपूर्वीसुद्धा अशीच जातीय दंगल पेटविण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती आता समोर आली आहे. तेव्हासुद्धा त्यानं तासभरात हजारो लोक जमा केले होते. मात्र पोलिसांनी त्यावेळी त्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. तेव्हा फारशी कडक कारवाई न झाल्यामुळेच फहीमचं बळ वाढल्याचं बोललं जात आहे.
advertisement
3 वर्षापूर्वी केला होता प्रयत्न...
फहीमनं चिथावणी दिल्यामुळेच बेभान दंगेखोरांनी दगडफेक, जाळपोळ, तोडफोड करतानाच महिला पोलिसांशी अश्लाघ्य वर्तन केले. तेव्हाचे प्रकरण तत्कालीन नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी संबंधित होते. नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर निर्माण झालेल्या वातावरणात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न फहीम खाननं केला होता. फहीम खानने नुपूर यांच्याशी संबंधित एक क्लिप तयार करून ती विशिष्ट समुदायातील ठिकठिकाणच्या तरुणांना पाठवून हजारोंचा जमाव जमवला होता. या जमावाकडून कामठीमध्ये दंगल घडवून आणण्याचा त्याचा मनसुबा होता. मात्र त्यावेळी पोलिसांचा ताफा पोहोचत त्यांनी तणाव निवळण्याचं काम केलं होतं.
जमावाला चिथावणी देणारा व्हिडीओ समोर...
या घटनेनंतर तेव्हापासून फहीम खान छोट्या-मोठ्या कुरापती करत होता. यावेळी मात्र त्याने जातीय दंगल घडवून आणण्यात यश मिळवले असल्याचे म्हटले जात आहे. आता पोलिसांनी त्याच्याशी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यात हे 3 वर्षापूर्वीचे प्रकरण समोर आले आहे. जमावाच्या मध्ये फहीम खान चिथावणीखोर वक्तव्य करत असतानाचा एक व्हिडिओही पोलीस अधिकाऱ्यांना सापडला आहे. यात त्याचे काही साथीदारही सोबत आहेत.
