नागपूर : समस्त बौद्धांची प्रेरणाभूमी आणि क्रांतिभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीक्षाभूमी परिसरात डौलाने उभा असलेला बोधिवृक्ष हा साधासुधा पिंपळाचा वृक्ष नव्हे, तर ज्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम यांना बुद्धत्व प्राप्त झाले, त्या कुटुंबातील वारसा होय. त्यामुळे या बोधिवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असून, बोधिवृक्षाचा हा वारसा दीक्षाभूमीलाही समृद्ध करतोय. या बोधिवृक्षाबद्दलच आपल्याला दीक्षाभूमीतील भदन्त सुगंध बोधी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन करून भारतभूमीला बुद्ध धम्म दिला. त्यानंतर सम्राट अशोकाने तथागतांचा धम्म देश विदेशात पोहोचवला. संघमित्रा आणि महेंद्र या आपल्या मुलांना बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसारासाठी श्रीलंकेला पाठवले. श्रीलंकेत प्रचारासाठी जात असताना, त्यांनी बौद्ध गयेतील मूळ बोधिवृक्षाची फांदी नेली. या फांदीचे त्यांनी श्रीलंकेतील अनुराधापूर येथे मोठ्या श्रद्धापूर्वक रोपण केले. श्रीलंका सरकारने या बोधिवृक्षाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. बोधिवृक्षाभोवती कम्पाउंड आणि वर सोन्याचा कळस चढवला,असं भदन्त सुगंध बोधी सांगतात.
गोर गरिबांसाठी 1 रुपयात शिक्षण, नागपुरातील तरुणाने सुरु केलं कॉन्व्हेंट
श्रीलंकेतील या बोधिवृक्षाला नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणण्याचे कार्य भदंत आनंद कौसल्यायन यांनी केले. भदन्त कौसल्यायन हे बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक व विचारवंत म्हणून जगविख्यात होते. श्रीलंकेत त्यांना मोठा मान होता. दीक्षाभूमीशी त्यांचे नाते दृढ झाल्यानंतर हा बोधिवृक्ष दीक्षाभूमीवर आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे तत्कालीन अध्यक्ष दादासाहेब गायकवाड आणि कार्यवाह सदानंद फुलझेले यांचा सिंहाचा वाटा होता. भदंत कौसल्यायन यांच्या विनंतीवरून श्रीलंका सरकारने संसदेत ठराव पारित केला व 1968 साली या बोधिवृक्षाच्या फांदीला भारतात आणण्याची परवानगी मिळाली. तीन वेगवेगळे कोवळे बोधिवृक्ष कुंडीत ठेवण्यात आले. विमानाने त्यांना भारतात आणण्यात आले.
12 मे 1968 साली दीक्षाभूमीवर समारंभपूर्वक त्याचे रोपण झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब गायकवाड होते. एकाच ठिकाणी या तिन्ही वृक्षांना आदरपूर्वक स्थान देण्यात आले. ते एकमेकांमध्ये मिसळून असे वाढले की, बघणाऱ्यांना तो एकच वृक्ष वाटावा. या पद्धतीने तथागतांच्या बुद्धत्वाचा वारसा जपणाऱ्या बुद्धगयेतील बोधिवृक्षाला दीक्षाभूमीवर पोहोचण्यासाठी श्रीलंकेचा मार्ग अवलंबावा लागला, अशी माहिती भदन्त सुगंध बोधी यांनी दिली आहे.