रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी ७६ हजार ७६८ मतांनी विजय मिळवला. बर्वे यांना ६ लाख १३ हजार २५ मते मिळाली. तर पराभूत झालेल्या राजू पारवे यांना ५ लाख ३६ हजार २५७ मते मिळाली. राजू पारवे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर उमरेड मतदारसंघातून विजय मिळवला होता. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता.
advertisement
रामटेकच्या जागेसाठी भाजप आग्रही होते. पण शिवसेना शिंदे गटाला जागा मिळाली. रामटेक मतदारसंघात शिवसेना आणि भाजपने आम्हालाच विजय मिळेल असा दावा केला होता. त्याआधी २००९ वगळता १९९९ पासून २०१९ पर्यंत शिवसेनेने या जागेवर विजय मिळवला होता.
काँग्रेसच्या उमेदवारीवरून गोंधळ
रामटेकमध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान झालं होतं. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून मोठा गोंधळ झाला होता. माजी जिल्हा परिषद सदस्या रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं काँग्रेसकडून ऐनवेळी त्यांचे पती श्यामकुमार बर्वेंना उमेदवारी दिली गेली होती. मतमोजणीत श्यामकुमार बर्वे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम राखली.
पंतप्रधान मोदींची सभा
राजू पारवे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा दोन वेळा इथे गेले होते. मात्र काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी राजू पारवे यांच्यासाठी हा किल्ला जोरदार लढवला आणि जिंकून आणला.