त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन दुचाकीवरून परतत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. शिवम राजेश उबेरहांडे (२२, रा. पांगरी उबेरहांडे, जि. बुलढाणा) आणि भूमिका समाधान खेडेकर (२१, रा. अंतरी खेडेकर, जि. बुलढाणा) अशी मृतांची नावे आहेत. ते एमएच १५ एवाय ६५ क्रमांकाच्या दुचाकीवर होते.
त्र्यंबकेश्वर गेस्टहाऊसजवळ उतारावरून येणारा टिपर समोरून चुकीच्या बाजूने येणाऱ्या सिलिंडरने भरलेल्या ‘छोटा हत्ती’ टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक लावल्याने उलटला. टिपरमधील दगड दुचाकीस्वारांवर कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या मदतीने टिपर बाजूला करण्यात आला. पंचनामा पूर्ण करण्यात आला असून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे भरधाव वेग आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवण्याचे धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत.
