मुंबई-आग्रा महामार्गावर (एनएच-3)इंदिरानगर बोगद्यावर गोविंदनगर- इंदिरानगर अशा दोन्ही बाजूने 'ग्रेड सेपरेट फ्लायओव्हर' बांधण्यात येणार आहे. यामुळे बोगद्याखालून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच गोविंदनगर, इंदिरानगरच्या बाजूने महामार्गाचे समांतर रस्त्यांवरील सर्व्हिस रोड वाहतूकसुद्धा एकेरी करण्यात येणार आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, आणि नागरिकांची गैरसोय टाळता यावी, यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त किरिथिका सी.एम यांनी वाहतूक मार्गात बदल केला असून विविध अटी-शर्तीच्या अधीन राहून अधिसूचना काढली आहे. वाहनचालकांनी सर्विस रोडचा एकेरी वापर करावा.
advertisement
असे असणार पर्यायी एकेरी मार्ग
साईनाथनगरकडून जाणारी वाहतूक बोगद्याच्या प्रारंभी डावीकडे वळण घेत सव्र्हिसरोडने डावीकडे वळण घेत लेखानगरकडे रवाना होईल.
गोविंदनगरकडून येणारी वाहतूक बोगद्याच्या प्रारंभी डावीकडे वळण घेत सरळ मुंबईनाक्याच्या दिशेने रवाना होईल.
या मार्गावरून प्रवेश बंद
मुख्य बोगद्यामधून गोविंदनगरच्या दिशेने, मुंबईनाक्याकडून लेखानगरच्या दिशेने समांतर रस्त्यावरून वाहनांना नो एंट्री तर इंदिरानगर सर्व्हिसरोडने मुंबईनाक्याच्या दिशेने येण्यास वाहनचालकांना बंदी असणार आहे.
उड्डाणमार्ग रस्त्याचा दोन्ही बाजूंना
नवीन बोगदा निर्मिती करताना मुख्य महामार्गावरील मुंबईनाका- पांडवलेणी व पांडवलेणी मुंबई-नाका बाजूने येजा करण्यासाठी वाहनांकरिता स्वतंत्र उड्डाणपुलाला समांतर उड्डाणमार्ग तयार करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहने त्या उड्डाणमार्गाचा वापर करत खालील वाहतुकीला कुठलाही अडथळा न करता मार्गस्थ होतील, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले आहे.






