येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपुरात एका कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेशीमबागच्या स्मृतिमंदिर येथील डॉ. हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. स्मारक समितीच्यावतीने माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी पंतप्रधानांचे स्वागत करणार असल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधान मोदींचा दौरा का?
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर हे संघाशी संबंधित आहे. सध्या नेत्रालय वर्धा रोडवर असलेल्या गजानननगरमध्ये सेवा देत आहे. माधव नेत्रालयाची नवीन इमारत हिंगणा रोडवरील वासुदेवनगर मेट्रो स्टेशनजवळ 6.8 एकर परिसरात प्रस्तावित आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक डॉ. भागवत सव्वा वर्षापूर्वी एका व्यासपीठावर आले होते. यानंतर उपराजधानीत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटसाठी पंतप्रधान येणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाला. सार्वजनिक कार्यक्रमात उभय नेते नागपुरात पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आचार्य गोविंद गिरी महाराज, अवधेशानंद महाराज आदींची उपस्थिती असणार आहे.
सरसंघचालकांसोबत स्वतंत्र भेट नाही?
रेशीमबाग येथील संघाच्या स्मृती मंदिर परिसरात संघाचे पाहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे स्मृती स्थळ आहे. रेशीमबागेतील स्मृतिमंदिराला भेट देतात, त्यावेळी सरसंघचालक वा ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहतात तराहतातच असा संघाचा शिष्टाचार नाही. स्मारक समितीच्यावतीने भैय्याजी जोशी पीएम मोदींचे स्वागत करतील. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांची स्वतंत्र वा गुप्त चर्चा या दौऱ्यात होणार नसल्याची चर्चा आहे. पीएम मोदी हे डॉ. भागवत यांना भेटण्यासाठी महाल येथील संघ मुख्यालयात जाण्याचीही शक्यता नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जाहीर कार्यक्रमात हे दोघेही एकाच व्यासपीठावर असतील.
