महिला असूनही स्वाती साठेंना गुन्हेगार टरकायचे
स्वाती साठे हे नाव महाराष्ट्रासाठी नवीन नाही. त्यांच्या नावाची नुसती चर्चा ऐकून अनेक कुख्यात गुंड आणि डॉन देखील घाबरायचे. अत्यंत स्वच्छ प्रतिमा आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांनी लौकिक होता. त्यांनी अनेक वर्षे तुरुंग प्रशासनाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात संजय दत्त, शाइनी आहुजा, याकूब मेमन, अजमल कसाब आणि अबू सालेम यांसारख्या मोठ्या गुन्हेगारांनी तुरुंगवास भोगला.
advertisement
संजय दत्तला थेट लाथा घालण्याचा इशारा
१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला टाडा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. तेव्हा तो तुरुंगातील कपडे घालण्यास नकार देत होता. तो हायप्रोफाइल आरोपी असल्याने काही तुरुंग कर्मचारी त्याच्याशी नम्रतेने वागत होते. पण तरीही संजय दत्त तुरुंगातील कपडे घालायला तयार नव्हता. ही बाब जेव्हा स्वाती साठे यांना कळली. तेव्हा त्या तातडीने तिथे पोहोचल्या आणि त्याला दरडावून विचारले, “संजू, तू बातों से मानेगा या लातों से?” स्वाती साठेंचा कणखर आवाज ऐकून संजय दत्त शांत झाला आणि त्याने लगेच तुरुंगातील कपडे घातले.
अतीक अहमदचा माज उतरवला
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड आणि राजकारणी अतीक अहमदला एका प्रकरणात मुंबईच्या तुरुंगात आणले होते. त्याने तुरुंगात येताच मला माझं जेवण बनवणारा आचारी हवा, अशी अजब मागणी केली. तेव्हा स्वाती साठे यांनी त्याची मागणी फेटाळून लावली आणि तुला तुरुंगातील जेवण जेवावं लागेल, असं ठणकावून सांगितलं. यामुळे अतिक अहमदचा इगो दुखावला. "आजपर्यंत माझ्याशी कोणीही अशाप्रकारे बोलण्याची हिंमत केली नाहीये," असं अतिक म्हणाला. यावर साठे यांनी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले, "तुमको क्या लगा कि यहां मुजरा देखने मिलेगा? अगर चिल्लाना बंद नहीं किया तो अंडा सेल में डाल दूंगी," अशी धमकी देखील साठेंनी दिली होती.
हे ऐकून अतीक अहमद गोंधळून गेला. त्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी त्याला स्वाती साठे यांच्या शिस्तीबद्दल आणि स्वच्छ प्रतिमेबद्दल सांगितले. त्यानंतर अतीक अहमद शांत झाला आणि दोन रात्री जमिनीवरच झोपला.
स्वाती साठे यांनी जेव्हा आर्थर रोड तुरुंगाचा कार्यभार स्वीकारला, त्याच्या आधी तुरुंगात कैद्यांच्या पार्ट्या रंगायच्या. गँगस्टर्सचे वाढदिवस साजरे व्हायचे. पण स्वाती साठे यांनी पदभार स्विकारताच हे सगळं बंद पडलं. त्यांनी तुरुंगात सांस्कृतिक कार्यक्रम, भजन-गजल आणि योगाचे वर्ग सुरू केले. कैद्यांनीही याला चांगला प्रतिसाद दिला होता.
गँगवॉर टाळण्यासाठी प्रचंड मेहनत
स्वाती साठे यांच्या कार्यकाळात, तेलगी स्टॅम्पपेपर घोटाळ्यात अनेक मोठे पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकारी तुरुंगात आले होते. त्यांना विशेष सुविधा मिळू नये, हे स्वाती साठे यांच्यासाठी मोठे आव्हान होते. त्या काळात अनेक गँगस्टर तुरुंगात एकमेकांसमोर आले होते. त्यामुळे गँगवॉर भडकण्याची भीती होती. हे टाळण्यासाठी साठे यांनी अशा आडदांड वृत्तीच्या गँगस्टरना वेगवेगळ्या बराकीत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पूर्ण दक्षता घेऊनही अबू सालेमवर मुस्तफा डोसाने चमच्याला धार लावून हल्ला केला होता.
स्वाती साठे बाहेरून कठोर असल्या तरी कैद्यांनी सुधारावे ही त्यांची मनापासून इच्छा होती. त्यांनी कैद्यांसोबत बराच वेळ घालवल्याने त्यांना त्यांची मानसिकता आणि अडचणी चांगल्या माहीत होत्या. तुरुंगातून बाहेर पडल्यावर कैद्याने सन्मानाने जगावे, यासाठी त्यांच्यात बदल होणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. अशाच कणखर आणि कर्तव्यनिष्ठ स्वाती साठे यांनी ३१ जुलैला निवृत्ती घेतली.