बोपोडी आणि मुंढवा या दोन वेगवेगळ्या जमीन गैरव्यवहार प्रकरणांमध्ये नावे गुंतल्याची चर्चा रंगल्यानंतर, आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) परिस्थिती स्पष्ट केली आहे. शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्रायझेसचे संचालक दिग्विजय पाटील ही नावे बोपोडीतील कृषी विभागाच्या जमीन अपहार प्रकरणातील नसून, ती मुंढव्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या जमिनीच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले. महसूल विभागाने एकत्रित तक्रार दिल्यामुळे पोलिसांनी चुकून एकाच गुन्ह्यात नोंद केली होती.
advertisement
बोपोडीतील कृषी विभागाची ५ हेक्टर ३५ आर सरकारी जमीन संगनमताने बेकायदेशीररीत्या खासगी व्यक्तींच्या नावे दाखविण्यात आल्याची तक्रार आहे. कुलमुखत्याधारक असल्याचा खोटा आदेश तयार करून सरकारी जमिनीवर मालकी हक्काचा दावा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांवर गुन्हे दाखल केले होते. यामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गावंडे, राजेंद्र विध्वंस, हृषिकेश विध्वंस, मंगला विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील (अमेडिया एंटरप्रायझेस) यांची नावे आहेत.
मात्र, शितल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची नावे बोपोडी नव्हे, तर मुंढवा प्रकरणाशी संबंधित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा नोंद असूनही अद्याप कोणतीही अटक झाली नाही. आरोपींना चौकशीसाठी नोटीस देखील नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जमिनीचा व्यवहार करणाऱ्या शितल तेजवाणी या फरार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
