सुनावणीदरम्यान, विष्णू चाटे याने कोर्टासमोर आपल्या नांग्या टाकल्या. त्याने डिस्चार्ज याचिका मागे घेतली. पण या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडने मात्र 'झुकेगा नही' अशीच भूमिका घेतली. त्याने आपला अर्ज मागे घेण्यास नकार दिला. संतोष देशमुख प्रकरणात आपला सहभाग नाही. आपल्याला या प्रकरणातून आरोपमुक्त करावं, अशी मागणी त्याने कायम ठेवली.
खरं तर, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी केल्यानंतर काही दिवसांतच वाल्मीक कराडने आपण निर्दोष असल्याची याचिका कोर्टात दाखल केली होती. आपण निर्दोष असून आपल्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी वाल्मीकने केली होती. यानंतर या प्रकरणातील सहआरोपी विष्णू चाटेनं देखील अशीच मागणी कोर्टाकडे केली होती. त्याने मी निर्दोष आहे, असा अर्ज कोर्टाकडे केला होता. तो अर्ज विष्णू चाटे यांच्या वकीलांनी आज मागे घेतला. हा अर्ज मागे घेताना विष्णू चाटे यानं पुन्हा अर्ज दाखल करण्याचा हक्क अबादीत ठेवून अर्ज मागे घेतला.
advertisement
वाल्मीक कराडचा अर्ज कोर्टात कायम आहे. आजच्या सुनावणीत यावर युक्तीवाद करण्यात आला. यावर कोर्टाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र हा निकाल वाल्मीक कराडच्या बाजुने लागला. तर त्याचा तुरुंगातून सुटण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.