सातारा : जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातील पश्चिम भागात जोर खोऱ्यात कृष्णा नदीवर बलकवडी हे धरण बांधलेलं असून धरणाचा एकूण पाणीसाठा हा 4 टी.एम.सी. इतका आहे. धरणाच्या फुगवट्यामुळे या भागातील गावांना मूळ जागेपासून विस्थापित व्हावं लागलं होतं. गेल्या वर्षी महाराष्ट्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे बलकवडी धरणातील पाणीसाठा सध्या घटला आहे. त्यामुळे धरणातील पुरातन अवशेष स्पष्टपणे दिसू लागले आहेत. बलकवडी धरणात तब्बल 24 वर्षांनी शिवकाळातील दोन मंदिरं पाहण्यासाठी खुली झाली आहेत. त्यातील पहिलं म्हणजे गोळेगाव येथील श्री धुरेश्वर मंदिर (धुर्जटलिंग) आणि दुसरं गोळेवाडी येथील श्री गोकर्णेश्वर मंदिर.
advertisement
यंदा धरणात फक्त काहीसा पाणीसाठा शिल्लक असल्यानं धरण संपूर्ण कोरडं पडलं आहे. यामुळे ही दोन मंदिरं दिसू लागली आहेत. मंदिराची निर्मिती 16-17व्या शतकातील शिवकाळात झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. 1976 साली धरणाच्या पाणी फुगवट्यामुळे ही मंदिरं पाण्याखाली गेली होती. याआधीसुद्धा 24 वर्षांपूर्वी ही मंदिरं पाणी पातळी कमी झाल्यामुळे अशीच पाहायला मिळाली होती आणि आता 2024 मध्येसुद्धा ती दिसू लागली आहेत.
हेही वाचा : मारुतीरायाची अशी मूर्ती कुठंच पाहिली नसेल; सातारच्या मंदिराची देशभरात ख्याती!
24 वर्षांनंतर पहिल्यांदाच धोम बलकवडी धरणाची पाणी पातळी कमी झाली आहे. वेदगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांच्या संगमावर पहिलं धुरेश्वर मंदिर असून त्याच्या कृष्ण महात्मामध्ये दूर जेटली उल्लेख आहे. त्यानंतर थोडं पुढे आल्यावर गोळेवाडी गावात गोकर्णेश्वर मंदिर आहे. हे मंदिर साधारण तेराव्या शतकातील असण्याची शक्यता आहे. कारण मंदिरातील पहिली विष्णूची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती अतिप्राचीन असल्याचं सांगण्यात येतंय. गणपतीची मूर्ती साधारण कर्नाटक शैलीतील आहे, तर विष्णूच्या मूर्तीत पद्म, चक्र, गद, आणि शंख असे 4 अस्त्र आणि मूर्तीच्या खाली गरुड दिसते. या मंदिराचा शिवकाळात जीर्णोद्धार केला असावा. 24 ते 25 वर्षानंतर हे मंदिर पुन्हा पाहायला मिळालंय.
24 वर्षे पाण्याखाली मंदिर असूनही पाण्याची पातळी घटल्यानंतर ते उघडलं असून आजदेखील सुस्थितीत आहे. आज 24 वर्षांनंतर या दोन्ही मंदिरांमध्ये जाऊन भक्तगण दर्शन घेऊ शकताहेत. या अतिप्राचीन मंदिरांचे अवशेष पाहण्यासाठी वाई पंचक्रोशीतील सर्व भक्तगण आणि पर्यटक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. हे अद्भुत, प्राचीन मंदिर पुन्हा कधी पाहता येईल का, पुन्हा किती वर्षांनी या मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल, अशी चर्चादेखील भक्तगण आणि भाविकांमध्ये होताना दिसत आहेत. साताऱ्यातील इतिहास संशोधक सौरभ जाधव यांनी याबाबत माहिती दिली.





