सातारा : तुरुंगात जायला प्रत्येकाला भीती वाटत असली, तरी तिथं कैदी कसे राहतात, कसं आयुष्य जगतात, त्यांच्यासाठी नेमके काय नियम असतात, याबाबत प्रत्येकालाच जाणून घेण्यात फार रस असतो. विशेष म्हणजे शिक्षा पूर्ण झाल्यावर तुरुंगाबाहेर आल्यानंतर कैद्यांना स्वावलंबी आयुष्य जगता यावं, यासाठी तुरुंगात विविध कामं शिकवली जातात. त्यांच्यासाठी वेगवेगळे उपयुक्त उपक्रम राबवले जातात. सातारा जिल्हा कारागृहात असाच एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
advertisement
कैद्यांच्या मनावरचं ओझं कमी व्हावं म्हणून त्यांच्यासाठी चक्क योग शिबीर आयोजित करण्यात आला. कारागृह पोलीस अधीक्षक शामकांत शेगडे यांच्या माध्यमातून राबवलेल्या या उपक्रमात कैद्यांकडून योग, ध्यानसाधना करून घेतली. यामुळे भूतकाळ विसरून त्यांना भविष्याकडे सकारात्मकदृष्ट्या पाहता येईल, हा यामागचा उद्देश होता.
सातारा कारागृहात 7 दिवस श्री श्री रविशंकर यांच्या टीमच्या माध्यमातून तुरुंगात योग शिबिर राबवण्यात आलं. याला कैद्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक कैद्यांनी यात सहभाग घेतला होता. श्री श्री पंडित रविशंकर यांच्या टीममधील भोसले गुरुजी आणि पवार गुरुजी 7 दिवस सकाळी 2 तास योगसाधना शिकवत असत, शिवाय श्वासावर कंट्रोल कसा ठेवावा, कपॅसिटी कशी वाढवावी, रागावर नियंत्रण कसं ठेवावं, याबाबत त्यांनी कैद्यांना मार्गदर्शन केलं. कारागृह पोलीस अधीक्षक शामकांत शेगडे यांनी याबाबत माहिती दिली.
हेही वाचा : तुरुंगात जन्मलेल्या बाळाच्या जन्म दाखल्यात 'स्थळ' काय लिहिलेलं असतं? 99 टक्के लोकांना माहित नसेल!
दरम्यान, आता यापुढेही मेडिटेशन सुरू ठेवा, अशी मागणी कैद्यांनी जिल्हा कारागृह अधीक्षकांकडे केली आहे. त्यामुळे या योगसाधना उपक्रमाचा कैद्यांवर चांगला परिणाम झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे या उपक्रमात कैद्यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी आपण केलेल्या गुन्ह्याचा आपल्याला पश्चाताप होत असल्याचं सांगितलं.
'कैद्यांची सुधारणा आणि पुनर्वसन यासाठी आम्ही सगळे काम करतोच. शिवाय त्यांच्या आरोग्याचा आणि शरिराचाही त्यांना सदुपयोग करता यावा, त्यांचं त्यांच्या विचारांवर नियंत्रण असायला हवं, आयुष्यात पुन्हा त्यांच्याकडून गुन्हा घडू नये, यासाठी योगसाधनेचा खूप चांगला परिणाम होताना दिसून येतोय', असं सातारा जिल्हा कारागृह अधीक्षक शामकांत शेगडे यांनी सांगितलं.





