सातारा : 19 जुलैपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसानं जोर धरला होता. मुंबई आणि परिसरातला पाऊस आता काहीसा ओसरलाय, परंतु काही भागांमध्ये मात्र अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. तिथले नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
सातारा जिल्ह्यात पावसामुळे भयावह स्थिती पाहायला मिळतेय. इथल्या ऐतिहासिक अशा प्रीतीसंगमावर कृष्णा-कोयना नद्यांची पाणीपातळी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झालीये. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठची मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. तसंच शहराच्या सखल भागात पाणी शिरलं असून प्रशासनानं नागरिकांना धोक्याच्या ठिकाणी न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, कोयना धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीवरील संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला असून परिसरातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. नदीची पाणीपातळी वाढल्यानं पाटण तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले असून गावं संपर्कहीन झाली आहेत.
advertisement
हेही वाचा : मच्छिंद्री झाली की महापूर आलाच! कोल्हापूरकर असं का मानतात? नेमकं काय होतं?
कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शिवसागर जलाशयात प्रति सेकंद 45 हजार क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचे सहाही वक्र दरवाजे 7 फुटांनी उचलून कोयना नदी पात्रात 32 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. धरणात सध्या 82 टीएमसी पाणीसाठी असून धरण 78 टक्के भरलंय.
धरणातून सुरू असलेल्या या पाण्याच्या बलाढ्य विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वर्षभर झुळझुळ वाहणाऱ्या नदीचा प्रवाह आता प्रचंड वाढलाय, त्यात धरणातूनही पाणी येत असल्यानं निसर्गाचं रूप आक्राळविक्राळ झालंय, त्यामुळे ते पाहण्यापासून लोक स्वतःला थांबवू शकत नाहीयेत. तसंच ओझर्डे धबधबाही पूर्ण क्षमतेनं कोसळतोय. अशात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सातारा जिल्हा प्रशासनानं पर्यटनस्थळं तात्पुरती बंद ठेवली आहेत.
कराडजवळ कृष्णा नदीवर असलेला खोडशी बंधारा फेसाळून वाहतोय, त्यामुळे कृष्णेचं पात्रही दुथडी भरून वाहतंय. सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनानं इथं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे, मात्र तरीही याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.





