सातारा : वर्ल्ड हेरिटेज म्हणून सातारच्या कास पठाराची ओळख आहे. इथली सुंदर रंगीबेरंगी फुलं आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक दाखल होतात. आता तर धो धो कोसळलेल्या पावसामुळे सातारचं सौंदर्य आणखी बहरलंय. इथले धबधबे, धरणं आणि तळी पूर्ण क्षमतेनं भरल्याचं पाहायला मिळतंय.
कास परिसरात 7 ते 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारं कास धरण हे पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागल्यानं धरणाला पुण्याच्या भुशी डॅमचं रूप आलंय, असं अनेकजणांनी म्हटलंय. तसंच मोठमोठे ओढे, नालेसुद्धा ओसंडून वाहत आहेत. कास धरण भरून वाहू लागल्यानं सातारकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
advertisement
हेही वाचा : महाबळेश्वर, पाचगणीचे पावसाळ्यातील नयनरम्य दृश्य, पर्यटकांची मोठी गर्दी, मोहित करणारे फोटो समोर!
कास धरणात मेअखेरीस 45 फूट पाणी शिल्लक होतं. त्यानंतर मान्सूनचं दमदार आगमन झाल्यानं पंधरवड्यातच ही पाणीपातळी एकूण 5 फुटांनी वाढली. मागील वर्षी पावसाळ्यात 78.720 फूट पाणीसाठा धरणात होण्याची अपेक्षा होती, मात्र 61.048 फूट पाणीसाठा झाला होता. परंतु यंदा मात्र धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून पाणीकपातीचं संकट टळल्याचं दिसून येतंय.
एका बाजूला पाण्याचा सुरेख प्रवाह आणि दुसऱ्या बाजूला आकाशातून उतरलेले ढग, अशा मनमोहक वातावरणात पर्यटकांचा सगळा ताण, शीण इथं अगदी गळून पडतो. वरून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि हिरव्यागार परिसरात धुक्याची चादर असा अद्भुत अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून इथं पर्यटक येतात. खरंतर पावसाळी पर्यटनाची लोक आतुरतेनं वाट पाहतात, परंतु विविध भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला असून वाटा निसरड्या झाल्या आहेत. अशावेळी दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पर्यटकांनी आपापली काळजी घ्यावी.





