सातारा: महाराष्ट्रातील सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून या जिल्ह्याचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे. याच जिल्ह्यात एक अनोखं गाव असून त्याची ओळखच मिलिटरी अपशिंगे अशी आहे. येथील घरटी माणून सैन्यात आहे. विशेष म्हणजे अगदी पहिल्या महायुद्धापासून ते कारगील युद्धापर्यंत येथील अनेक सैनिकांनी देशासाठी बलिदान दिलंय. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर याच गावाचा दैदिप्यमान इतिहास जाणून घेऊया.
advertisement
साताऱ्यातील अपशिंगे गावची पूर्वापार सैन्यात सेवा देण्याची परंपरा आहे. त्यामुळे अगदी पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा असं पिढ्यानपिढ्या सैन्यात सेवा देणारी कुटुंब इथं पाहायला मिळतात. त्यामुळे मुलांच्या जन्मापासूनच त्यांचं सैन्यात जाण्यासाठीचं ट्रेनिंग सुरू होतं. सध्या या गावातील 2 हजारांहून अधिक सैनिक आहेत.याच अनोख्या परंपरेमुळं गावाला मिलिटरी अपशिंगे म्हणून ओळखलं जातंय.
अपशिंगेचा विजयस्तंभ सांगतो वारसा
अपशिंगे गावात एक विजयस्तंभ आहे. हा गावच्या इतिहासाचा वारसा सांगणारा साक्षीदार आहे. विजय स्तंभाच्या पाठीमागच्या बाजूला गावातील सैनिकांच्या पराक्रमाचा इतिहास आहे. इंग्रजांच्या काळात पहिलं महायुद्ध झालं. तेव्हा या गावातील 46 सैनिक शहीद झाले होते. याची शिळा विजयस्तंभावर लावण्यात आली आहे.
1962 मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात गावातील चार जवान शहीद झाले. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेले सुभेदार दिनकर भैरू पवार यांचं नावे देखील येथे आहे. त्याचबरोबर आझाद हिंद सेनेमध्ये गावातील 4 जण सहभागी होते. त्यांचे नावेही याठिकाणी आहेत. एकंदरीतच या विजय स्तंभाला भेट दिल्यानंतर या गावाचा इतिहास आणि वारसा लक्षात येतो. हाच वारसा सध्याची पिढी देखील पुढे चालवत असून अनेक तरुणांचा कल सैन्यात जाण्याकडेच आहे, असे गावचे सरपंच तुषार निकम सांगतात.
Independence Day Special : पुण्यात साकारली ऑलम्पिक आणि वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंची रांगोळी, VIDEO
सैनिकाचा मुलगा बनतो सैनिक
सातारा जिल्ह्यातील विविध गावांतील अनेक जण सैन्यात आणि सुरक्षा दलात आहेत. हे जवान मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, इंजिनिअर रेजिमेंट, मद्रास रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत. तसेच नौदल, हवाईदल, बीएसएफ, सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलांत मोठ्या संख्येने जिल्ह्यातील जवान सेवा बजावत आहेत. सैन्यातून कॅप्टन पदावरून निवृत्त झालेले शंकरराव देशमुख सांगतात की, "ज्या पद्धतीने शिक्षकाचा मुलगा शिक्षक आणि इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर बनतो, तसेच आपशिंगे गावात सैनिकी परंपरा आहे."





