सातारा : ऐतिहासिक जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख आहे, या जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिरं आहेत. 7व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंतच्या सर्व मंदिरांची नोंद पुरातनात आढळते, असं म्हणतात. हजारो वर्षांपूर्वीची अतिप्राचीन मंदिरंदेखील साताऱ्यातील अनेक भागांमध्ये वसली आहेत. असंच एक अद्भुत आणि पुरातन मंदिर सातारा जिल्ह्याच्या परळी खोऱ्यातील बनगर गावात आहे. गावकरी सांगतात की, हे पांडवकालीन मंदिर असून असं मंदिर महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतभरात कुठंही पाहायला मिळत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे 2 दिशांना मुख करून बसलेला या मंदिरातील एकाच शिळेवरचा मारुतीराया.
advertisement
सातारा शहरापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या परळी खोऱ्यात बनगर गावात एकाच शिळेवर 2 मारुतीरायांचं हे अद्भुत मंदिर आहे. गावातल्या जाणकार व्यक्ती या मंदिराबाबत काही अख्यायिकाही सांगतात. त्यानुसार, हे मंदिर नदीपात्रात पांडवांनी स्थापन केलं होतं. परळी खोऱ्यातील अनेक गावांनी या मारुतीरायाला आपल्या गावात स्थापन करण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाच दगडावर 2 तोंड असलेला हा मारुती गावाची वेशी उलटून देत नसल्याचं गावकरी सांगतात. मग बनगर गावकऱ्यांनी इथंच त्याची प्रतिष्ठापना केली.
हेही वाचा : अद्भुत! वर्षांमागून वर्षे सरले, अखेर निर्जला एकादशीला ते 3 शुभ योग जुळून आले
महत्त्वाचं म्हणजे स्थापनेनंतर मूर्तीसमोरून एखादी काळी गाय किंवा काळं वस्त्र परिधान करून महिला गेली असता तिचा मृत्यू होत असे, अशीही अख्यायिका सांगितली जाते. कारण एकाच दगडावर दोन्ही बाजूला मारुती असलेल्या या शिळेची एक बाजू सुख-दु:खाची असल्याचं म्हणतात. जेव्हा विद्वान पंडितांना विचारून या मारुतीच्या तोंडाची दिशा फिरवली तेव्हा कुठे गावात सुख, शांती नांदू लागली, असं गावकरी सांगतात.
आतापर्यंत आपण मारुतीरायाची अशी अनेक मंदिरं पाहिली असतील जिथं मारुतीरायाचं तोंड दक्षिण, उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेला असतं. परंतु बनगर गावात मात्र मंदिरात समोर मारुतीरायाचं तोंड पूर्व बाजूला आणि मागच्या दिशेला मारुतीरायाचं तोंड पश्चिम बाजूला आहे. म्हणजेच पूर्व बाजूचं मारुतीरायाचं तोंड दक्षिणेकडे आणि पश्चिम बाजूचं तोंड उत्तरेकडे आहे. एकाच शिळेवर उत्तर मुखी आणि दक्षिण मुखी मारुतीराया वसलेला हे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे हे अद्भुत मंदिर पाहायला देशभरातून भाविक, पर्यटक परळी खोऱ्यातील बनगर गावात दाखल होतात.