विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत सुरू असलेले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. अन्न-पाण्याची, पावसाची तमा न बाळगता लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दोन दिवसांपासून अत्यंत चिवटपणे आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे. आता, या मराठा आंदोलकांसाठी राज्यातील विविध भागातून रसद पुरवठा होऊ लागला आहे. तर, दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार आज आझाद मैदानात दाखल होण्याची शक्यता आहे. शरद पवार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा करण्याची शक्यता आहे.
advertisement
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आझाद मैदानात सुरू आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून राज्यभरातून मराठा बांधव आझाद मैदानात दाखल झाले आहे. काल रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
काल मराठा आरक्षणावर भाष्य, आज मैदानात...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मनोज जरांगे यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. शनिवारी, शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना घटना दुरुस्ती करावी लागेल असे वक्तव्य केले होते. शरद पवार हे आज मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. दुपारी अथवा संध्याकाळी शरद पवार हे आझाद मैदानात दाखल होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांंनी याआधी अंतरवाली सराटीत पोलिसांनी मराठा उपोषण आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर जरांगे यांची भेट घेतली होती.
शरद पवारांनी काय म्हटले होते?
मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारच घेऊ शकते, असे स्पष्टपणे सांगत तामिळनाडूच्या आरक्षण पद्धतीकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले. शरद पवारांनी शनिवारी भाष्य करताना म्हटले की, प्रगतीच्या रस्त्यावर जायचे असेल तर त्याला आरक्षणाची आवश्यकता आहे, हा आग्रह मांडला जातो. केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा. तामिळनाडूमध्ये 72 टक्के आरक्षण राहू शकते तर वेळप्रसंगी घटनेमध्ये बदल करून सुद्धा मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्याचा निकाल संसदेमध्ये घेतला पाहिजे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी केली.