राज्यसभेत झालेल्या संविधानावरील दोन दिवसीय चर्चेच्या समारोपात शाह यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावेळी शाह यांनी आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन झाली असल्याचे म्हटले. यावरून अमित शाह आणि भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, भाजपकडून याआधी महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान झाला आहे. माजी राज्यपाल कोश्यारी यांनी महात्मा फुले-सावित्रीमाई फुले यांचा अपमान केला. त्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. बाबासाहेबांच्या अपमानावर मिंदे, अजितदादा काही बोलणार की नाही? रामदास आठवले काही बोलणार की नाही, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील लोक शांत बसत आहेत. आपल्या महापुरुषांचा अपमान झाल्यानंतरही ते शांत आहेत, अशी खंतही उद्धव यांनी व्यक्त केली.
advertisement
तुमच्या इशाऱ्यावर वक्तव्य केलंय का?
उद्धव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आवाहन केले. भाजप आणि संघाने यावर भूमिका स्पष्ट करावी. भाजप, संघाने सांगावे की तुम्हीच अमित शाहांना बोलायला सांगितले का असा सवालही ठाकरेंनी केला. शाह यांच्या वक्तव्याने भाजपच्या मनातील काळं समोर आलं असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्या वक्तव्यातून मनोविकृती बाहेर आली....
ज्या मनोविकृतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या मनोविकृतीमुळे धर्मांतर करावे लागलं. तिच मनोविकृती अमित शाह यांच्या तोंडातून बाहेर आली असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. भाजपकडून शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला आहे. नेहरूनंतर आता बाबासाहेबांवर टीका सुरू केली असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले.