ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी याबाबत संकेत दिले. राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याला आम्ही त्यांना आमंत्रित करू शकतो.दोघे स्टेजवर येतील की नाही माहित नाही, मात्र आम्ही त्यांना आमंत्रित करु शकतो. जसा आमचा दसरा मेळावा आहे तसा त्यांचा पण मेळावा असतो त्यामुळे ते देखील आम्हाला आमंत्रित करु शकतात.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी केलेलं वक्तव्य हे महत्त्वपूर्ण मानलं जाते .
advertisement
राज ठाकरे यांची भाषणशैली आणि जनसंपर्काचा अनोखा अंदाज नेहमीच चर्चेत राहतो. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) सध्या महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे नव्याने घडवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर होणारा हा संभाव्य राजकीय "ठाकरे मिलाफ" राज्यातील राजकारणात नवा अध्याय लिहू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
यंदाचा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या घडामोडींचा केंद्रबिंदू
राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर खरंच एकत्र आले, तर भाजपसह महाविकास आघाडी आणि महायुतीच्या समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यावर्षीचा दसरा मेळावा केवळ राजकीय मेळावा नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या घडामोडींचा केंद्रबिंदू ठरू शकतो.
राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला
सध्या तरी राज ठाकरे यांचा अधिकृत प्रतिसाद आलेला नाही. मात्र, ठाकरे गटाकडून मिळालेल्या संकेतांमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाचा दसरा मेळावा "ठाकरे सोबत ठाकरे" या समीकरणाने रंगणार का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.