पारंपरिक कलेचे प्रतीक असलेल्या कुंभारवाड्यातील हे दृश्य दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांना आकर्षित करत आहे. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत विक्रेते आणि ग्राहक यांची लगबग सुरू असते. विशेष म्हणजे, यंदा मागील वर्षाच्या तुलनेत पणत्यांच्या दरात थोडीशी घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कुंभारवाड्यातील विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साध्या मातीच्या पणत्या 30 रुपये डझनपासून सुरू होतात. तर डिझाईन आणि रंगसंगती असलेल्या आकर्षक पणत्या 40 ते 50 रुपये डझन दराने विकल्या जात आहेत. याशिवाय दिवाळी पूजेच्या पारंपरिक साहित्यांमध्ये लक्ष्मीमूर्ती, सजावटी दिवे, कंदील आणि मातीच्या मूर्तींचीही विक्री बाजारात जोमात सुरू आहे.
advertisement
कुंभारवाडा हा शिवकालीन काळापासून ओळखला जाणारा भाग असून येथे पिढ्यान्पिढ्या कुंभार कलेचा वारसा जपणारे कारागीर आजही पारंपरिक पद्धतीने पणत्या तयार करतात. काही विक्रेते स्वतःच्या हाताने पणत्या घडवतात, तर काही व्यापारी या पणत्या बाहेरून मागवून घेतात. दरम्यान, सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यामुळे अनेक लघु उद्योगांनाही या काळात चांगली चालना मिळते.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, यंदा दर कमी झाल्याने खरेदी अधिक होत आहे. मागील वर्षी डिझाईन पणत्यांचे दर जास्त होते. पण यंदा भाव कमी असल्याने आम्ही अधिक पणत्या घेतल्या आहेत. घर सजवताना पारंपरिक मातीच्या पणत्यांचा वेगळाच आनंद असतो, असे एका महिला ग्राहकाने सांगितले.
कुंभारवाड्यातील रस्ते आज रंग, माती आणि सणाच्या आनंदाने उजळले आहेत. दिवाळीच्या उत्साहासोबत पुणेकरांनी या वर्षीही कुंभारवाड्याला भेट देऊन पणत्यांच्या खरेदी करताना पाहिला मिळत आहे.