सीना नदीचा उगम अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. अहिल्यानगरमध्ये शनिवारी आणि रविवारी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे सीनेच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि नदीला पुन्हा एकदा पूर आला. अहिल्यानगरमधून वाहणारी सीन नदी पुढे सोलापूर जिल्ह्यातून वाहते. नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूरमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सोलापूर-विजापूर महामार्ग पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. महामार्ग अचानक बंद झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली असून वाहनांच्या लांबच-लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
advertisement
मराठवाडा आणि सोलापुरात सुरू असलेल्या पावसामुळे 24 सप्टेंबर रोजी देखील नदीला महापूर आला होता. तेव्हा देखील सोलापूर-विजापूरला जोडणारा महामार्ग पाण्याखाली गेल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर तब्बल 48 तासानंतर या महामार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती.