कुर्डूवाडी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर भोसरे या गावात राहणारे शंकरराव रिकिबे त्या काळात एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्ती होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शंकरराव यांचे घनिष्ठ संबंध होते. ज्या-ज्या वेळेस बाबासाहेब या भागात सभा, मिटिंग घेत होते, त्याचे नियोजन, व्यवस्था शंकरराव रिकिबे करत होते. बाबासाहेब या ठिकाणी आल्यावर आवर्जून शंकरराव रिकिबे यांना बोलावून घेत असत.
advertisement
शंकरराव रिकिबे यांचे शेत भोसरे गावा लगत असून या शेतामध्ये दोन मजली इमारत बांधावी आणि एक विहीर बांधावी अशी इच्छा शंकररावांनी बाबासाहेबांसमोर व्यक्त केली. शंकरराव रिकिबे यांनी बाबासाहेबांसमोर सांगितलेली इच्छा खरी करून दाखवली आणि दोन मजली इमारत आणि विहीर बांधली. शंकररावांनी बांधलेल्या या दोन्ही वास्तूंच्या उद्घाटनासाठी बाबासाहेबांना निरोप दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. शंकरराव यांनी बांधलेले घर आणि विहीर ही रेल्वे मार्गांपासून 50 मीटर अंतरावर होती. ज्यावेळेस रेल्वे या ठिकाणी आली, तेव्हा शंकररावांनी अनधिकृतपणे रेल्वेगाडी थांबवून बाबासाहेबांना रेल्वेतून खाली उतरवून घेतले आणि बांधलेल्या वास्तूचे 1937 साली उद्घाटन करून घेतले. रेल्वे गाडी अनधिकृतपणे थांबवून घेतल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्याने त्यांच्यावर दंड ठोठावला, अधिकाऱ्याने ठोठावलेला दंड शंकररावांनी जमा देखील केला. पंढरपुरात सुद्धा शंकरराव रिकिबे यांचा रिकिबे वाडा सुद्धा आहे आणि या वाड्याचे सुद्धा उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करून घेतले होते.





