दौंड-कलबुर्गी अनारक्षित विशेष रेल्वे गाडी
गाडी क्रमांक 01421/01422 दौंड-कलबुर्गी अनारक्षित दैनिक विशेष गाडी मध्य रेल्वेने यापूर्वी 1 डिसेंबर 2025 पर्यंत आठवड्यातून पाच दिवस सुरू केली होती. गुरुवार आणि रविवार वगळता ही गाडी नियमित चालवली जाते. आता प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत ही गाडी सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे गुरुवार आणि रविवार वगळून आठवड्यातील पाच दिवस ही गाडी धावणार आहे.
advertisement
दौंड-कलबुर्गी अनारक्षित विशेष रेल्वेच्या येत्या काळात एकूण 126 फेऱ्या होणार आहेत. ही गाडी व्यापारी वर्ग, कामगार, विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने फेऱ्यांचा विस्तार प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
द्वि-साप्ताहिक अनारक्षित विशेष रेल्वे गाडी
गाडी क्रमांक 01425/01426 दौंड-कलबुर्गी द्वि-साप्ताहिक अनारक्षित विशेष रेल्वे गाडी यापूर्वी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत धावणार होती. आता ही गाडी 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत दर गुरुवारी आणि रविवारी धावणार आहे. दौंड-कलबुर्गी द्वि-साप्ताहिक अनारक्षित विशेष रेल्वे गाडीच्या एकूण 26 फेऱ्या होणार आहेत.
दौंड-कलबुर्गी विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये, रचनेमध्ये आणि थांब्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटासह प्रवास करण्याची विनंती मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच अनारक्षित कोचसाठी स्थानकावर बुकिंग काउंटर आणि युटीएस द्वारे देखील बुकिंग करता येणार आहे. तसेच या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा NTES APP वर जाऊन माहिती घेता येईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.






