TRENDING:

रक्ताची धुळवड खेळण्याची अनोखी परंपरा, सायंकाळी गावात होते तुफान दगडफेक, Video

Last Updated:

महाराष्ट्रातील भोयरे गावात चक्क रक्ताची धुळवड साजरी केली जाते. गावकऱ्यांचे दोन गट एकमेकांवर तुफान दगडफेक करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी
advertisement

सोलापूर : महाराष्ट्रात होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. काही गावात हा उत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याची परंपरा आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका गावच्या धुळवडीची सर्वत्र चर्चा असते. मोहोळ तालुक्यातील भोयरे येथे चक्क रक्ताची धुळवड साजरी केली जाते. गावातील लोकांचे दोन गट सायंकाळी एकमेकांवर तुफान दगडफेक करतात. यात जखमी झालेल्यांना गावातील जगदंबा देवी मंदिरात भंडारा लावला जातो. जेवढे जास्त लोक जखमी होतील तेवढा पाऊस चांगला पडतो, अशी गावातील लोकांची धारणा आहे.

advertisement

कशी साजरी होते धुळवड?

भोयरे येथे उंचावर जगदंबा देवीचे मंदिर आहे. धुळवडीच्या दिवशी गावातील एक गट देवीच्या मंदिरावर थांबतो. तर दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो. दिवसभर येथील तरुण दगड-गोटे जमा करतात आणि सायंकाळी एकमेकावर तुफान दगडफेक करतात. यामध्ये अनेक तरुण जखमी देखील होतात. मात्र हे जखमी लोक दवाखान्यात किंवा डॉक्टरकडे न जाता देवीच्या भंडाऱ्यावर नीट होतात. जेवढे जास्त लोक जखमी होतील त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो, अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळली जाते, असे गावकरी बालाजी साठे यांनी सांगितले.

advertisement

तब्बल 135 वर्षांची परंपरा, महाराष्ट्रात 'या' ठिकाणी राजा करतो रेवड्यांची उधळण, काय आहे हा प्रकार?

दगफेकीची अनोखी परंपरा

भोयरे येथील जगदंबा मंदिर उंचावर आहे. या मंदिरात गावकऱ्यांचा एक गट थांबतो. तर पायथ्याला असणाऱ्या गावातील मुख्य चौकात दुसरा गट उभा राहतो. खाली उभा राहिलेल्या गटातील लोक उंचावर असणाऱ्या मंदिरातील गटावर दगड-गोटे भिरकावतो. तर वरून चौकात थांबलेल्या लोकांवर दगड-गोटे भिरकावले जातात. खाली थांबलेले लोक अंगावर येणारे दगड चुकवतात. परंतु, या दगडफेकीत काहींना दगड लागतात आणि रक्तही येते. तेव्हा जखमी व्यक्तीला मंदिरात नेत जखमेवर देवीचा भंडारा लावला जातो. त्यामुळे जखम बरी होते, अशी गावकऱ्यांची धारणा आहे.

advertisement

दरम्यान, भोयरे येथील रक्ताची धुळवड पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोक जमतात. वर्षानुवर्षे साजऱ्या होणाऱ्या या धुळवडीला अद्याप कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. त्यामुळे ही परंपरा पुढेही कायम सुरू राहील, असे गावकरी सांगतात.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
रक्ताची धुळवड खेळण्याची अनोखी परंपरा, सायंकाळी गावात होते तुफान दगडफेक, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल