सोलापूर - विडी घरकुल येथील पद्मशाली शिक्षण संस्था संचलित मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेमध्ये नैसर्गिक रंग निर्मिती प्रकल्प हाती घेण्यात आला. होळी आणि रंगपंचमी हे सण साजरे करीत असताना वेगवेगळ्या स्त्रोतापासून तयार केलेले कृत्रिम रासायनिक रंग कोरड्या स्वरूपामध्ये आणि ओल्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी वापरले जातात.
हे कृत्रिम रासायनिक रंग बनवण्यासाठी शिसे, निकेल, कॅडमियम झिंक ,पारा अशा अनेक संयुगांचा वापर केला जातो. या घटकांची आणि त्यांच्या घातक परिणामाची आपण दखल घेत नाही. अशा रासायनिक रंगामुळे आपली त्वचा, डोळे, केस, फुफ्फुसे यांना त्रास होऊ शकतो. असे रंग आरोग्यास व पर्यावरणास घातक असतात आणि म्हणूनच याला पर्याय म्हणून नैसर्गिक रंग वापरणे ही काळाची गरज बनलेली आहे. ही गरज ओळखून बिटला प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग तयार केले.
advertisement
असे तयार करा नैसर्गिक रंग -
हळद, पिवळ्या झेंडूच्या पाकळ्या, जास्वंद, गुलाबाच्या पाकळ्या, मेहंदीचे पान, बीट,पालक या नैसर्गिक पदार्थांना रात्रभर थोड्याशा पाण्यामध्ये भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी ते उकळून घ्यावे. मिक्सरमधून फिरवून घ्यावे व हा लगदा मैदा अथवा कॉर्नफ्लॉवर यामध्ये मिसळून घ्यावे, हे पीठ ओव्हनमध्ये किंवा कडक उन्हामध्ये वाळवून घ्यावेत. यानंतर नैसर्गिक कोरडा रंग तयार होतो. तसेच बीट, पिवळी आणि नारंगी झेंडूची फुले, पालक, पुदिना ,आवळा, बेलाचे फळ, गुलाब ,जास्वंद, कडूलिंबाचा पाला, मेंदीची पानं यांच्यापासून ओल्या रंगाचीही निर्मिती करता येते.
नैसर्गिक रंगाचे फायदे -
नैसर्गिक रंग हे हानिकारक नसतात. नैसर्गिक रंगांमध्ये इतर रासायनिक पदार्थ बाहेरून टाकले जात नाहीत. नैसर्गिक रंगामुळे शारीरिक इजा होत नाही. रंग त्वचेसाठी चांगले असतात. उदा. हळद नैसर्गिक रंगामुळे डोळ्यांसारख्या नाजूक भागांना इजा होत नाही. नैसर्गिक रंग सहजपणे उपलब्ध होतात. नैसर्गिक रंग त्वचेवरून सहजपणे निघू शकतात. नैसर्गिक रंगासाठी खर्च कमी येतो आणि नैसर्गिक रंग पर्यावरणासाठी उपयुक्त ठरतात आणि म्हणूनच खेलो होली इको फ्रेंडली हा संदेश या प्रकल्पातून देण्यात आला.
प्रशाळेतील पर्यावरणाचे शिक्षक अभिजभानप यांनी विद्यार्थ्यांना हे रंग कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण दिले. सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर या रंगाची निर्मिती केली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल यांनी नैसर्गिक रंगाचे महत्त्व सांगून सर्व विद्यार्थ्यांना या प्रकल्पा बद्दल शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले. तसेच पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ गड्डम, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिवा संगीता इंदापुरे, खजिनदार नागनाथ गंजी, विश्वस्त श्रीधर चिट्टयाल, विजयकुमार गुल्लापल्ली, सुरेशजी बिटला आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले.