लक्ष्मण अंबादास देवरकोंडा असं आत्महत्या करणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो दत्ता नगर झोपडपट्टी परिसरात वास्तव्याला होता. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याने अवंती नगर परिसरातील रेल्वे रुळाजवळ रेल्वेसमोर उडी घेऊन जीवन संपवलं आहे.
लक्ष्मणने काही महिन्यांपूर्वीच एमआयडीसी परिसरात एक गॅरेज सुरू केले होते. त्याचा व्यवसाय चांगला सुरू होता. तो हळूहळू प्रगती करत होता. असं असताना त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास लक्ष्मणने त्याचा मित्र अनिल याला व्हिडीओ कॉल केला. यावेळी त्याने आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. अनिलने तात्काळ लक्ष्मणचा भाऊ नरेश याला फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर मित्रांनी लक्ष्मणचा शोध सुरू केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अवंती नगरजवळ रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळून आला. लोहमार्ग पोलीस सुरज वायदंडे यांनी त्याला तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लक्ष्मणच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्याच्या पश्चात त्याची पत्नी, दोन भाऊ आणि एक पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. लक्ष्मणने आत्महत्या का केली? याचा शोध पोलीस घेत आहेत.