मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. राज्य सरकारची ही याचिका फेटाळल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, पोलिसांनी FIR दाखल केलं नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करते का ते पाहावं लागणार आहे.
advertisement
कोर्टाची ऑर्डर असतानाही पोलिसांनी FIR दाखल केलं नाही, त्यांच्या आदेशाचं उल्लंघन झालं आहे, हायकोर्ट पोलिसांवर कारवाई करणार का हे पाहावं लागणार असल्याचे त्यांनी म्हटले. पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले.
प्रकाश आंबेडकर यांनी पुढे म्हटले की, या केस मध्ये राज्य सरकार आरोपी आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू राज्य सरकारच्या ताब्यात असताना झाला आहे. सरकारनं हात झटकून घेण्याचे काम केले. आम्ही कोर्टाला हे निदर्शनास आणून दिले. आता हायकोर्ट कस्टडीतील मृत्यू बाबत नियम तयार करेल. जे जे रुग्णालयातील डॉक्टरांना आम्ही आरोपी करणार आहोत, अशी माहितीदेखील अॅड. प्रकाश आंबेडकरांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 जुलै रोजी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, या विरोधात पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज सकाळी या संदर्भातील सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विजयबाई सूर्यवंशी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील त्यांच्या कायदेशीर लढ्याला अखेर यश मिळाल्याचे मानले जात आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या खटल्याच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केले असून, हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा असल्याचे बोलले जात आहे.
या केसमध्ये पीडित सुर्यवंशी कुटुंबियांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर, ॲड. प्रतीक बोंबार्डे, ॲड. कीर्ती आनंद यांनी बाजू मांडली.
प्रकरण काय?
परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची 10 डिसेंबर 2024 रोजी विटंबना झाली होती. या घटनेनंतर आंबेडकरी संघटनांनी परभणीत तीव्र आंदोलन करत बंद पुकारला होता. या बंदला अचानक हिंसक वळण लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसेच लाठीचार्जही करण्यात आला. याचवेळी मूळचा लातूरचा आणि पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र अवघ्या दोनच दिवसांत पोलीस कोठडीत सोमनाथचा मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचे सांगण्यात आले.