मिळालेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील जानराववाडी-बेळंकी दरम्यान हा प्रकार घडला आहे. आमदार आपल्या दारी आणि ग्रामविकास जनसंवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी आमदार इद्रिस नायकवडी आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे हे दोघे एकत्र दुसऱ्या गाडीतून जात होते. पण, त्याचवेळी महामार्गावर मागे असणाऱ्या नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक झाली.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, नायकवडी यांच्या ताफा महामार्गावरून जात असताना दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारे दुचाकीवरून आलेले अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहे. आमदार नायकवडी कोणत्या कारणातून दगडफेक झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस दाखल झाले. त्यांनी घटनास्थळीची पाहणी केली आहे. शहरात नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. फरार हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
advertisement
इद्रिस नायकवडी यांची प्रतिक्रिया
गावातील अडअडचणी जाणून घेण्यासाठी माझा दौरा सुरू आहे. मागील महिन्यांपासून हा दौरा सुरू आहे. आज आम्ही जाधववाडीपासून बेळंकीकडे जात होतो. त्यावेळी माझ्यासोबत अजित घोरपडे होते आणि अनेक पदाधिकारी आणि सहकारी होते. चार ते पाच वाहनं होती. मी अजित घोरपडे यांच्या कारमधून बसून प्रवास करत होतो. माझ्या कारमध्ये पदाधिकारी आणि सुरक्षारक्षक बसलेले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात लोकांनी दगडफेक करून पळून गेले. आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे, तपासातून माहिती समोर येईल, अशी प्रतिक्रिया इद्रिस नायकवडी यांनी दिली.