तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. पुणे पोलिसांनी तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर वाऱ्याच्या वेगाने सूत्रे फिरवली. अवघ्या चार तासांत बँकॉकला जाणारे विमान आणि सावंतांचा मुलगा दोघांनाही पुण्यात लँड करण्यास पुणे पोलिसांनी भाग पडले. पुणे पोलिसांच्या कार्यतत्परतेची राज्यात जोरदार चर्चा आहे. संबंधित व्यक्ती घरातून निघून गेल्यानंतरच्या २४ तासांनंतर अपहरणाची तक्रार घेतली जाते. परंतु तानाजी सावंत यांनी आपले राजकीय वजन वापरून तातडीने तपास करण्यास भाग पाडले.
advertisement
सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा दुपारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घरातून तडकाफडकी बाहेर पडला. स्पेशल चार्टर फ्लाईटने तो बँकॉकला निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बजाब एव्हिएशनच्या फाल्कन 2000 एलएक्स नावाच्या खासगी विमानाने ऋषीराज सावंत तीन मित्रांसह बँकॉकला जायला निघाले होते.
तानाजी सावंत यांनी कोणाला फोन केले?
मुलाला बँकॉकला जाऊ न देण्याचा बापहट्ट पूर्ण करण्यासाठी तानाजी सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई उड्डयण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोन केले. या दोघांनाही ही घटना अतिशय गंभीर असल्याचे भासवले. त्यानंतर विमान माघारी बोलावण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुलाच्या कारच्या ड्रायव्हरने आधीच तानाजी सावंत यांना ऋषीराज सावंत यांना विमानतळावर सोडल्याची माहिती दिली.
अन् हवेतूनच विमान माघारी फिरवले
कौटुंबिक वादातून घरातून बाहेर पडलेल्या मुलाला थांबविण्यासाठी शिवसेना नेते, माजी मंत्री तानाजी सावंत यांनी संपूर्ण यंत्रणा वेठीस धरली. पुणे पोलिसांवर दबाव आणून तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांनी खासगी विमान कंपनीला विमान चेन्नईला उतरवून घ्यायला भाग पाडले.
तानाजी सावंत हे शिवसेनेचे मोठे आणि महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांनी याआधी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदावर काम करताना अनेक महत्त्वाची खातीही सांभाळली आहेत. पुणे आणि परिसरात त्यांचे आर्थिक साम्राजही मोठे असल्याने त्यांचा दबदबा आहे.