ठाणे हे रेल्वे नेटवर्कमधील अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनचा संगम येथे होतो. दररोज लाखो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. अशा गजबजलेल्या ठिकाणी स्टेशन मास्तरपदी नियुक्त होणं ही मोठी जबाबदारी मानली जाते. आतापर्यंत अनेक पुरुष स्टेशन मास्तरांनी ठाण्याचा कारभार सांभाळला होता; मात्र महिला अधिकारी म्हणून अपर्णा देवधर-ब्राह्मणे यांची नियुक्ती हा ठाण्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
advertisement
BMC चा मोठा निर्णय, मुंबईत शनिवार-रविवारीही करता येणार विवाह नोंदणी, नवे नियम
कारकिर्द आणि योगदान
अपर्णा देवधर-ब्राह्मणे यांनी 14 सप्टेंबर 1992 रोजी रेल्वे सेवेत प्रवेश केला. सुरुवातीला कुर्ला स्थानकात सहाय्यक प्रबंधक म्हणून काम करताना त्यांनी कारकिर्दीची पायाभरणी केली. त्यानंतर ठाणे, कल्याण, डोंबिवलीसारख्या गर्दीच्या स्थानकांवर उपप्रबंधक म्हणून अनुभव घेतला. टिटवाळा–इगतपुरी सेक्शनवर निरीक्षकपदाची जबाबदारी आणि तुर्भे स्थानकावर प्रबंधकपदाचा कार्यभार सांभाळताना त्यांनी व्यवस्थापन कौशल्याचा ठसा उमटवला.
एकूण 33 वर्षांच्या सेवेत अपर्णा यांनी आपली जबाबदारी नेहमीच काटेकोरपणे आणि यशस्वीपणे पार पाडली. ठाणे स्थानकाचे प्रबंधक केशव तावडे यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्यावरच ही जबाबदारी सोपवण्यात आली.
पुरस्कार आणि सन्मान
अपर्णा देवधर-ब्राह्मणे यांच्या कारकिर्दीत अनेक गौरव नोंदले गेले आहेत. हार्बर मार्गावर धावलेल्या पहिल्या एसी लोकलला हिरवा झेंडा दाखवण्याचा मान त्यांना मिळाला होता. महिला सक्षमीकरण कार्यक्रमासाठी त्यांची निवड झाली होती. तसेच रेल्वे सेवेत उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना तीन वेळा ‘डीआरएमओ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.