पलावा जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पलावा उड्डाणपुलाचे काम हाती घेतले गेले होते. हे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून खासगी कंत्राटदाराकडून केले गेले. मात्र लोकार्पण झाल्यानंतर काहीच दिवसांत या पुलाची अवस्था बिकट झाली आहे. पुलावर काही दिवसांत पावसाने खड्डे पडले आणि हा पूल पुन्हा चर्चेत आला. हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला त्यावेळी नागरिकांची डोकेदुखी कमी होईल असं वाटलेलं, परंतु तसं न होता नागरिकांना आणखी जास्त समस्यांचा सामना करावा लागत आहे.
advertisement
पुलावर खड्डे, नागरिकांचे हाल
गेल्या काही दिवसांपासून शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने, विविध परिसरातील रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत, ज्यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना त्रास होत आहे. अशा या ठिकाणी अनेक अपघात होत असूनही अद्याप खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. या रस्त्यावरून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक शारीरिक तसेच मानसिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याचं प्रवासी सांगतात. या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त होऊन लवकरात लवकर चांगल्या रस्त्यांची मागणी करत आहेत.
खड्ड्यांतील वाळू रस्त्यावर
एकंदरीत ठाण्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असताना काही ठिकाणी आता हे खड्डे बुजविण्यासाठी वाळू टाकण्यात आलेली असून त्यामुळे दुचाकी आणि हलकी वाहने घसरून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.






