उत्तर प्रदेशात गंगा नदीच्या काठावर वसलेलं वाराणसी हे शहर हिंदू धर्मीयांचं पवित्र तिर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी काशी विश्वेसराचं मंदीर आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी काशीला जावं, असं म्हटलं जातं. गंगेच्या किनावर असलेले घाट, गंगेचा शांत प्रवाह, दिव्यांची रोषणाई आणि पारंपरिक वातावरण ही वाराणसी शहराची वैशिष्ट्ये आहेत. हीच बाब लक्षात घेऊन दीपक चित्ते यांनी गणपतीसमोर काशीचा देखावा उभा केला आहे. दीपक चित्ते म्हणाले, "प्रत्येकाला काशीला जाणं शक्य होत नाही. त्यामुळे लोकांना इथेच तो अनुभव देता यावा म्हणून आम्ही काशी उभी केली."
advertisement
या सुंदर डेकोरेशनसाठी सुमारे 10 ते 12 दिवस मेहनत घेण्यात आली. नोकरीवरून घरी आल्यानंतर घरातील प्रत्येकाने वेळ काढून एकत्र येऊन या कलाकृतीची निर्मिती केली आहे. संपूर्ण नियोजन दीपक यांचा मुलगा निरंजन चित्ते यांनी केलं आहे. साक्षी, मानसी आणि भावेश चित्ते या भावंडांनी देखील त्यांना मदत केली. दीपक चित्ते यांचे बंधू प्रकाश चित्ते आणि पत्नी ज्योती चित्ते यांनीही घरकाम सांभाळत डेकोरेशनमध्ये मोलाचा हातभार लावला. फक्त घरच्यांनीच नव्हे, तर शेजारी आणि मित्रपरिवारही या कामात सहभागी झाला होता. देखाव्याची तयारी करताना आशिष मोरे यांचं विशेष सहकार्य लाभलं.
दीपक चित्ते म्हणाले, "गणपती बाप्पा घरी येतात तेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. ही गोष्ट सर्वात जास्त समाधान देणारी आहे." दीपक चित्ते यांच्या घरगुती बाप्पासमोर दरवर्षी आकर्षक देखावा उभा केला जातो. त्यांच्या इको-फ्रेंडली डेकोरेशनला दरवर्षी पुरस्कार देखील मिळतो. यंदा त्यांनी उभा केलेला 'काशी'चा देखावा गणेशभक्तांसाठी खास आकर्षण ठरत आहे. अनेक गणेश भक्त हा देखावा बघण्यासाठी त्यांच्या घरी येत आहेत.