तुळशीबाग गणेश मंडळाचं यावर्षी 125वं वर्ष असल्याने उत्सवात ऐतिहासिक रंग भरला आहे. कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशीबाग मंडळाला देखावे साकारण्याची दीर्घ परंपरा आहे. 1992 पासून हे मंडळ धार्मिक आणि पौराणिक विषयांवर आधारित भव्य देखावे साकारत आहे. यंदा मथुरेतील वृंदावनाच्या धर्तीवर देखावा तयार केला आहे. भाविकांना प्रत्यक्ष तिथल्या वातावरणाची अनुभूती मिळेल, यासाठी सखोल अभ्यास करून प्रतिकृती साकारली आहे.
advertisement
Pune Ganeshotsav: याची देही याची डोळा, बघा जलमय द्वारका! शनिपार मंडळाचा भव्य देखावा ठरतोय आकर्षण
पारंपरिकतेचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात तुळशीबाग गणपती मंडळाचा हातखंडा आहे. यंदा सजावटीत नवीन प्रकाशयोजना, साउंड इफेक्ट आणि प्रतिकृतींमध्ये वास्तवदर्शी रंगसंगतीचा समावेश करण्यात आला आहे. वृंदावनातील मंदिरं, रासलीला प्रसंग, श्रीकृष्णाच्या बाललीला अशा अनेक देखाव्यांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
मंडळातील पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, या देखाव्याची तयारी तीन ते चार महिन्यांपूर्वीपासून सुरू होती. भारतातील अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देणं, प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणूनच लोकांना त्या ठिकाणाचा अनुभव मिळावा, तसेच ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व कळावे, यासाठी या प्रतिकृती तयार केल्या जातात. या देखाव्यांच्या माध्यमातून श्रद्धाळूंना अध्यात्मिक आनंद मिळतो आणि संस्कृतीचं संवर्धनही होतं.
तुळशीबाग हे महिलांचं मुख्य आकर्षण असलेली बाजारपेठ आहे. गणेशोत्सवाबरोबरच मंडळ वर्षभर सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतं. अनाथ मुलींना तुळशीबाग बाजारात खरेदीसाठी आणणे, विविध महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविणे, तसेच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील उपक्रम आयोजित करणे, असे उपक्रम वर्षभर सुरूच असतात. आधुनिकतेची कास धरत परंपरा जपणे हा मंडळाचा मुख्य उद्देश असल्याचं कोषाध्यक्ष पंडित यांनी सांगितलं.
गणेशोत्सवाच्या काळात तुळशीबाग परिसरात प्रचंड गर्दी होते. यंदा मंडळाचे शतकोत्तर वर्ष असल्याने सजावटीकडे भाविकांचं विशेष लक्ष आहे. धार्मिक वातावरण, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि पौराणिक इतिहासाची झलक देणारा वृंदावन देखावा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.