ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या आधी आपण घटनाबाह्य सरकार पाहिले, त्यानंतर जो निकाल आला तो अनाकलनीय होता. याला ईव्हीएम सरकार बोलतात.
मुख्यमंत्री मंत्र्यांची ओळख करून देण्याची प्रथा असते. यावेळी पहिल्यांदाच असेल की, ज्यांच्यावर अनेक आरोप केले, त्यांच्याच परिचय मुख्यमंत्र्यांना करून द्यावा लागला. मुख्यमंत्र्यांनी शाश्वत धर्म असे म्हटले होते. हा कोणता धर्म आहे हे तेच सांगू शकतील असेही ठाकरे यांनी म्हटले.
advertisement
शिंदेंचे आमदार ठाकरेंकडे येणार?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मंत्रिपदासाठीच्या इच्छुकांची चांगलीच संख्या होती. मात्र, या इच्छुकांना संधी न मिळाल्याने नाराजीचे वातावरण आहे. काहींनी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना आपला मतदारसंघ गाठला आहे. उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून महायुतीला टोला लगावला. त्यावेळी शिंदेंचे आमदार संपर्कात आहेत का, असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना उद्धव यांनी सांगितले की, काहींचे निरोप आले आहेत. पण, अनुभव हा मोठा गुरू असतो. मला 2019 मध्ये आला. आता हाच अनुभव त्यांनादेखील घेऊ द्यात असे वक्तव्य ठाकरे यांनी केले.
छगन भुजबळ यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, छगन भुजबळ हे संपर्कात असतात. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांच्यासोबत संपर्क झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले की, भुजबळ यांच्याबद्दल वाईट वाटले, अनेक आमदारांचे कोट घट्ट झाले आहेत. या सरकारची झाली आहे दैना, त्यामुळे तिकडे चैना वगैरे नाही, असे त्यांनी म्हटले.
लाडकी बहीण योजनेवर ठाकरेंचे भाष्य...
उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन फडणवीस सरकारला सवाल केला. याआधी कोणतेही निकष लावले नव्हते, मग लाडकी बहिण योजनेचे पैसे देताना आता निकष का लावताय? असा सवाल करताना त्यांनी आवडती नावडती न करता सर्वांना दिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
