वर्धा: नागपूरची संत्री प्रसिद्ध असून ती सर्वांनी चाखली आहेत. मात्र कश्मीरी संत्री कधी खाल्लीत का? वर्धा येथील रोहिणी विजय बाबर यांच्या घरी काश्मिरी संत्र्याचे झाड आहे. गेल्या तेरा वर्षांपासून बाबर यांच्या परसबागेत काश्मिरी संत्री बहरली आहे. महाराष्ट्रातील संत्र्यांपेक्षा ही संत्री वेगळी आहेत. आतून लाल तर चवीला तुरट असून एका संत्र्याचे वजन दोन ते तीन किलो आहे. या काश्मिरी संत्रीमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असून आरोग्यासाठी फार हितकारक आहे.
advertisement
काश्मीरवरून आणले रोप
13 वर्षांपूर्वी डॉ विजय बाबर यांचे मित्र डॉ शिवकुमार पुंडकर यांनी हे झाड काश्मीर वरून आणलं होतं. आम्हाला भेट दिल्यानंतर हे झाड लावून त्याची खूप काळजी घेतली. सुरवातीला काही वर्षे त्याला फळं नव्हती. मात्र काही वर्षांनी ह्या झाडाला फुले दिसू लागली आणि सुंदर फळ ही लागू लागली. त्यानंतर हे फळ आकाराने खूप मोठे असल्याने कुतूहलाचा विषय ठरला. या फळाला कोकणात पपनस असं म्हणतात. हे फळ शुगरच्या रुग्णांसाठी आणि पोटाचे आजार असलेल्या रुग्णांसाठी हितकारक आहे. या फळाचे वजन दोन ते 3 किलो इतकं आहे, असे रोहिणी बाबर सांगतात.
पित्तामुळे त्रासले आहात? आयुर्वेदातील ‘या’ थेरेपीमुळे होईल सुटका, एकदा फायदे पाहा
छट पूजेसाठी महत्त्व
आपल्याकडे या फळांचं उत्पादन कमी दिसून येत असलं तरी बिहार, ओडिशा, हिमालय, उत्तर प्रदेश या ठिकाणी या फळाला फार महत्व आहे. छट पूजेसाठी या फळाला खूप महत्व ते देतात. हे फळ तिकडे प्रति नग 100 रुपये ते 300 रुपयांपर्यंत मिळते. वरून कडक असल्यामुळे हे फळ चाकूने सोलून घ्यावे लागते. सोलायला खूप वेळ लागतो. फळाचा रंग अतिशय सुंदर असून फळांचा ज्यूस खूप चविष्ट बनतो. जर तुम्ही शुगरचे पेशंट नसाल तर थोडी साखर, मीठ आणि जिरेपूड घालून ज्यूस पिऊ शकता. खूप चविष्ट लागतो अशी माहिती बाबर यांनी दिली.
अनेक वर्धेकर ही संत्री कुतूहलाने बघतात. संत्र्यांनी लगडलेलं झाड बघण्यासाठी बाबर यांच्याकडे भेटी देतात आणि आवडीने खातातही. या कश्मीरी संत्रीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. त्यामुळे सामान्य संत्रीपेक्षा वेगळी दिसणारी आणि वेगळी असणारी ही संत्री तुम्हीही चाखायला विसरू नका.





