सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हा दुपारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घरातून तडकाफडकी बाहेर पडला. स्पेशल चार्टर फ्लाईटने तो बँकॉकला निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बजाब एव्हिएशनच्या फाल्कन 2000 एलएक्स नावाच्या खासगी विमानाने ऋषीराज सावंत तीन मित्रांसह बँकॉकला जायला निघाले होते. तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. पुणे पोलिसांनी तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर वाऱ्याच्या वेगाने सूत्रे फिरवली. अवघ्या चार तासांत बँकॉकला जाणारे विमान आणि सावंतांचा मुलगा दोघांनाही पुण्यात लँड करण्यास पुणे पोलिसांनी भाग पाडले. ऋषिराज सावंत यांनी घर सोडून जाण्यामागे कौटुंबिक वाद, कलह असल्याची चर्चा आहे. मात्र, तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.
advertisement
गिरीराज सावंत यांनी काय सांगितले?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गिरीराज सावंत यांनी सांगितले की, माझा लहान भाऊ ऋषिराज सावंत याच्याशी संपर्क होत नव्हता, तेव्हा तो कुठे निघून गेला कळत नव्हतं म्हणून तानाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि त्यानंतरच आम्ही सिंहगड पोलीस स्टेशन या ठिकाणी अपहरणाची तक्रार दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील फोन करून तानाजी सावंत यांनी मदतीसाठी विनंती केली असल्याचे सांगितले. या तक्रारीनंतर तो बँकॉकला काही कामानिमित्ताने गेला असल्याचे समजले अशी माहिती गिरीराज सावंत यांनी दिली.
ऋषिराज सावंतने घर का सोडले?
घरात कौटुंबिक वाद असल्याची चर्चा गिरीराज सावंत यांनी फेटाळून लावली. त्यांनी सांगितले की, दहा दिवस अगोदरच ऋषिराज हा दुबईला जाऊन आला होता. पुन्हा एकदा बँकॉकला का चाललाय असे घरचे विचारतील. या कारणाने त्याने घरात कोणालाच न सांगता खासगी विमान बुक केले आणि बँकॉकला निघाला होता, अशी माहिती गिरीराज सावंत यांनी दिली.
राजकारण करू नका, विरोधकांना आवाहन...
गिरीराज सावंत यांनी सांगितले की, पोलिसांनी काल ऋषीराज पुण्यात दाखल झाल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला. पोलीस पुढील तपास करत असून आम्ही त्यांना सहकार्य करणार आहोत. विरोधकांनी कृपया याचं राजकारण करू नये त्यांना देखील मुलं असतील असं आवाहनही सावंत यांनी केले.