नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रहिवासी इसुब हारून नगरिया हे कामानिमित्त शहराबाहेर गेले होते. १ जानेवारी रोजी रात्री जेव्हा ते घरी परतले, तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाजाची साखळी तुटलेली दिसली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी त्यांच्या घराची एक चावी हरवली होती. चोरट्यांनी कदाचित हीच चावी मिळवून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय नगरिया यांनी व्यक्त केला आहे. मात्र, दाराला असलेल्या 'डिजिटल लॉक'च्या अतिरिक्त सुरक्षेमुळे घरफोडीचा मोठा डाव फसला.
advertisement
सोन्यापर्यंत पोहोचले मात्र डाव फसला
मिळालेल्या माहितीनुसार घरात प्रवेश केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त दिसून आलं. त्यावरुन घरात नेमकं काय घडलं असावं याचा अंदाज लागला. चोरट्यांनी कपाट उसकटून लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लॉकरला डिजिटल पासवर्ड असल्याने तो फोडण्यात चोरांना अपयश आलं. सगळे प्रयत्न फुकट गेले. तर घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित राहिल्या.चोरट्यांकडे घराची खरी चावी असतानाही केवळ 'डिजिटल लॉक'मुळे एका कुटुंबाचा लाखोंचा ऐवज चोरीला जाता जाता वाचला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांची वेगवान कारवाई
नगरिया यांनी ३ जानेवारी रोजी घाटंजी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा माग काढत त्याला जेरबंद केले. या कारवाईत पोलीस कर्मचारी राहुल खंडागळे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
चोरट्यांकडे चावी असूनही केवळ सतर्कता आणि तंत्रज्ञानामुळे नगरिया यांच्या घरातील लाखो रुपये आणि दागिने सुरक्षित राहिले. या यशस्वी कारवाईनंतर शहरात समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांचा खाकी वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
