बाईकस्वारांनी दिले पत्र
या धमकी प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञाताविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भैरवनाथ शुगर्स संचालित तेरणा साखर कारखान्याचा ट्रॅक्टर ऊस घेऊन तेरकडून ढोकी येथे येत होता. हा ट्रॅक्टर मुळेवाडी पाटीवर आला असता, दुचाकीवर आलेल्या दोघांनी ट्रॅक्टर रोखला. यानंतर चालकाजवळ एक बंद पाकीट दिले. 'हे पाकीट तेरणा कारखान्याच्या गेटवर सुरक्षा रक्षकाकडे दे' असे म्हणत दोघेही सुसाट निघून गेले.
advertisement
बाईकस्वारांनी सांगितल्या प्रमाणे ट्रॅक्टर चालकाने पाकीट सुरक्षा रक्षक संजय निपाणीकर यांच्याकडे दिले. त्यांनी पाकीट उघडून पाहिले असता, 100 रुपयांची एक नोट व चिठ्ठी निघाली. 'धनंजय सावंत व केशव सावंत यांचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल', असा मजकूर त्या चिठ्ठीत होता. धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, तर केशव सावंत हे तेरणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत.
पोलिसांकडून गुन्हा दाखल...
पत्राद्वारे धमकी मिळाल्याचे समोर येताच, तेरणा कारखान्याचे शेतकी अधिकारी मच्छिंद्र पुंड, सुनिल लगडे, संजय निपाणीकर यांनी ढोकी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी झाला होता गोळीबार...
काही महिन्यांपूर्वीच तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. दोन अज्ञात इस्मानी दुचाकीवरुन गोळीबार केल्याचा धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाने सांगितले होते.