ठाणे : कल्याणमध्ये खडकपाडा येथील 'ठेचा वडापाव' हा प्रसिद्ध आहे. मागील 25 वर्षांपासून सुभाष शिंगाडे हे ठेचा वडापाव विकत आहेत. आपल्या मुलाला प्रसादला सुभाष यांनी शिकवून मोठं केलं. त्याला उच्चशिक्षण दिलं. प्रसाद शिंगाडे या तरुणाने बीएमएमची पदवी घेत जाहिरात क्षेत्र निवडले आणि मेहनतीच्या बळावर त्याने हे यश मिळवत आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज केले.
advertisement
प्रसादने अनेक शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंट्रीजचे दिग्दर्शन केले आहे. प्रसाद हा झीसह अन्य कंपनीत जाहिरात क्षेत्रात नोकरी करत होता. प्रसाद हा त्याच्या कामात सेट होता आणि त्याला चांगले यशदेखील मिळत होते. मात्र, त्याचे मन त्या क्षेत्रात रमत नव्हते. त्यामुळे प्रसादने आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे न्यायचे ठरवले. एक चांगला दिग्दर्शक, काही नवीन करण्याची कल्पना त्याने आपल्या व्यवसायात वापरली.
तरुणांना हल्ली चीज खूप आवडतं. म्हणून त्याने चीज वडापाव सुरु केला. सोबतच तंदूर वडापाव, मॅक्सिकन वडापाव असे वेगवगेळे प्रकार तो ग्राहकांना देऊ लागला. त्याचा चीज वडापाव तरुणांना खूप आवडू लागला. आता त्याच्या या वडापावची मागणी खूप असते. प्रसादकडे मिळणारे वडापावची किंमत पाहिली तर साधा वडापाव विथ ठेचा हा 17 रुपये, चीज वडापाव हा 35 रुपयांना मिळतो.
प्रसादने नोकरी सोडली आणि तो वडापावच्या व्यवसायात वळला. आजही त्याचे काही मित्र कॉर्पोरेट लाइफ जगत आहेत. पण तो म्हणाले की, मला जर एखादी गोष्ट विकत घ्याची असेल, तर मला महिन्याला किती हप्ता जाईल, नियोजन हा विचार करावा नाही लागत, मी सरळ दुकानात जातो आणि कॅश देऊन जे हवं ते घेऊ शकतो. इथे मी स्वतःच मालक आहे. भले मला शनिवार, रविवार सुट्टी नको मिळो. पण मला समाधानाची झोप आहे आणि काम केल्याचा आनंद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.