मुंबई : शेतकऱ्याच्या मुलानं शेतकरी व्हायचं नाही, ही विचारसरणी आता बऱ्यापैकी मागे पडली असून शेतातील विविध आधुनिक प्रयोगांसह अनेक तरुण शेतकरी पुढे येतात. कृषीविषयक रीतसर पदवीचं शिक्षण घेऊन आता तरुणमंडळी केवळ प्रगत शेतकरीच नाही, तर कृषी क्षेत्रातील अधिकारी होतात. अशाच या क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे.
advertisement
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतर्गत इंग्रजी माध्यमातील 3 वर्षांचा कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी म्हणजेच बीएससी ॲग्रीकल्चर अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जातो. यंदा या प्रवेश प्रक्रियेला 26 जूनपासून ऑनलाईन पद्धतीनं सुरूवात झाली आहे. विद्यार्थ्यांना 5 जुलैपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
हेही वाचा : या सरकारी शाळेला तोड नाही! 13 पुरस्कार, 25 आदर्श शिक्षक, 200 विद्यार्थी प्रतीक्षेत
या प्रवेशसाठी खुल्या प्रवर्गातील म्हणजे जनरल कॅटेगिरीतील विद्यार्थी एकूण सीजीपीए 6.0 आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थी किमान 5.0 सीजीपीए सह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्रवेशाबाबत सविस्तर माहिती http://agripug2024.mahacet.org या पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आणि ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी 26 जून 2024 पासून सुरूवात झाली असून 5 जुलै 2024 ही शेवटची तारीख आहे.
राज्यातल्या या विद्यापीठांमध्ये मिळणार प्रवेश
महाराष्ट्रातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या चारही कृषी विद्यापीठांतर्गत सीईटी द्वारे बीएससी ॲग्रीकल्चरच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेता येतो.