जालना : शेती हा व्यवसाय हा सर्वाधिक आव्हानात्मक बनत चालला आहे. याला अनेक कारणे आहेत. मात्र कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी काही प्रयोगशील शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून आपली आर्थिक उन्नती करत असतात. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तनवाडीचे शेतकरी जगदीश शेंडगे यांनी देखील असाच प्रयोग केला आहे. खजूर म्हटलं की आपल्याला सौदी अरेबिया किंवा इराण इराक सारखी आखाती देश आठवतात. मात्र, मराठवाड्यासारख्या दुष्काळी जालना जिल्ह्यातील शेंडगे यांनी आपल्या शेतावर खजुराची शेती फुलवली आहे. यावर्षी या खजुराच्या झाडांवर मोठ्या प्रमाणावर खजूर लागली असून यातून तब्बल 15 ते 20 लाखांचे उत्पन्न शेंडगे यांना अपेक्षित आहे.
advertisement
कशी सुचली खजूर शेतीची आयडिया?
शेतकरी जगदीश शेंडगे यांची तनवाडी शिवारात 25 एकर स्वतःची शेतजमीन आहे. ऊस उत्पादक शेतकरी असल्याने शेंडगे आपला ऊस घेऊन बागेश्वरी कारखान्याला गेले होते. तेव्हा त्यांनी या कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणावर खजुराची झाडे पाहिली. ही झाडे पाहूनच पहिल्यांदा त्यांच्या मनात ही शेती करण्याचा विचार आला. अधिकची चौकशी केल्यानंतर त्यांना गुजरातमधील एका व्यक्तीच्या साह्याने ही रोपे मिळू शकतात अशी माहिती कळाली आणि त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. चार वर्षांपूर्वी चार हजार रुपये प्रति झाड याप्रमाणे 200 झाडांची ऑर्डर शेंडगे यांनी दिली या झाडांची 25 बाय 25 अंतरावर आपल्या तीन एकर क्षेत्रात लागवड केली.
मराठवाड्यात पिकतंय काश्मिरी सफरचंद, विमानानं आणली रोपं अन् कसं केलं नियोजन? Video
18 ते 20 लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा
तिसऱ्या वर्षापासून या झाडांना फळे येण्यास सुरुवात झाली असून मागील वर्षी त्यांना यामधून पाच टन खजुराचे उत्पन्न झालं. याला दीडशे रुपये प्रति किलो याप्रमाणे भाव मिळाला. एकूण 7 ते 8 लाखांचे उत्पन्न मागील वर्षी शेंडगे यांना झालं. यावर्षी खजुराच्या झाडावर मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट खजूर असून प्रति झाड दीड ते दोन क्विंटल खजूर निघण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा 10 ते 12 टन उत्पन्न होणार असून यातून 18 ते 20 लाख उत्पन्न होईल अशी अपेक्षा रामेश्वर शेंडगे यांनी व्यक्त केली.
एक दोन नव्हे तब्बल साडेतीन फुटांचं बाजरीचं कणीस, जालन्याच्या शेतकऱ्यानं कशी केली कमाल? Video
विशेष म्हणजे या खजुरांच्या झाडांना हलक्या प्रतीची जमिनीची आवश्यकता असते. त्याच पद्धतीने 25 बाय 25 अंतरावर लागवड असल्याने यामध्ये आपण सोयाबीन आणि गहू यासारखी वर्षात दोन अंतर पिके घेऊ शकतो. शेंडगे यांना गव्हाच्या अंतर पिकातून तब्बल 25 कट्टे उत्पन्न देखील झाले. जून महिन्यामध्ये हे खजूर विक्रीसाठी येणार असून घरासमोरील रस्त्यावरच स्टॉल लावून त्याची विक्री करणार आहेत. पारंपारिक पिकांना फाटा देऊन नवनवीन पिके तसेच प्रयोग केल्यास शेती देखील फायदेशीर ठरू शकते हेच जगदीश यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी देखील दिशादर्शक ठरत असून अनेक शेतकरी त्यांच्याकडे या पिकाविषयी विचारणा करण्यासाठी येत आहेत.





