मुंबई : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गुंतवणूकदारांना परतावा मिळत असला तरी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये काहीसं चिंतेंचे वातावरण आहे. सोन्याच्या वाढत्या दराला ब्रेक लागेल असं अनेकांना वाटत आहे. सोन्याचे दर आगामी काही दिवसात कमी होतील का, याबाबत एक्सपर्टने अंदाज वर्तवला आहे,.
advertisement
गेल्या आठवड्यात भारतातील सोन्याच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला. सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर 1 लाख 7 हजार 627 रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. 999 शुद्ध सोन्याचे दर 1 लाख 6 हजार 619 रुपये आहेत. तर GST सह हेच दर 1 लाख 7 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
मात्र, तज्ज्ञांनी सांगितलं की, जागतिक आर्थिक संकेत आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या विधानांमुळे, येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत चढ-उतार होऊ शकतात. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक व्यापार झालेला सोन्याचा करार शुक्रवारी प्रति 10 ग्रॅम 1,04,090 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर त्यात काहीशी घसरण दिसून आली.
मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर कमकुवत झालेल्या रुपयाने ही वाढ आणखी वाढवली. रुपयाची 51 पैशांनी घसरण झाली. प्रति अमेरिकन डॉलर 88.09 रुपयांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. ही घसरण परदेशी निधींकडून मोठ्या प्रमाणात विक्री आणि भारत-अमेरिका व्यापार करारावरून वाढत्या तणावामुळे झाली.
सोन्याच्या किमतीत आणखी घट होणार?
जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी रिसर्च) प्रणव मेर म्हणाले, "येत्या आठवड्यात, उत्पादन आणि सेवा क्षेत्राचा पीएमआय डेटा, यूएस रोजगार अहवाल, भारतातील उत्सवी मागणी, रशिया-युक्रेन शांतता कराराची अनिश्चितता आणि भारत-अमेरिका संबंधांवर लक्ष असणार आहे. त्याशिवाय, सोन्यात काही प्रमाणात नफा वसुलीदेखील होऊ शकते. मात्र, एकूण चित्र पाहता सोन्याचे दर मजबूत राहतील असा अंदाज आहे. मेर यांच्या मते, अल्पकालीन दृष्टिकोनातून, सोन्याचे भाव 1,08,000 ते 1,10,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतात.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) अक्षा कंबोज म्हणाल्या की, रुपयाच्या कमकुवतपणामुळे देशांतर्गत सोन्याचे भाव जास्त आहेत. देशांतर्गत बाजारात सोने 1 लाख रुपयांपेक्षा जास्त राहील असे त्यांनी म्हटले.
कंबोज यांनी पुढं म्हटले की, अलीकडेच अमेरिकन अपील न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शुल्क बेकायदेशीर घोषित केले आहे. या प्रकरणातील घडामोडींवर बाजाराचे लक्ष राहणार आहे.
जागतिक स्तरावर, न्यू यॉर्कमध्ये डिसेंबर डिलिव्हरीसाठी कॉमेक्स सोन्याचे वायदे शनिवारी 1.2 टक्क्यांनी वाढून 3530.70 डॉलर प्रति औंसवर बंद झाले. 8 ऑगस्ट रोजी गाठलेला ऐतिहासिक उच्चांक 3534.10 डॉलरच्या जवळ आहे. एंजल वनचे डीव्हीपी (संशोधन, बिगर-कृषी वस्तू आणि चलन) प्रथमेश मल्ल्या म्हणाले की, 20 ऑगस्टपासून आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमती 6.6 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
किमतींमध्ये झालेल्या मोठ्या वाढीनंतर, नजीकच्या काळात करेक्शन येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुल्ल्या यांनी सांगितले की, "येत्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत काही घट होऊ शकते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किमती सर्वोच्च पातळीवर आहेत आणि डॉलर निर्देशांक देखील 100 च्या महत्त्वाच्या पातळीवर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अमेरिकेकडून कोणते संकेत मिळत आहेत?
फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी अलीकडेच लेबर मार्केट जोखमीवर भर दिला आहे, ज्यामुळे 16-17 सप्टेंबरच्या धोरण बैठकीत व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा वाढली आहे. परंतु फेड गव्हर्नर लिसा कुकला काढून टाकण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नामुळे मध्यवर्ती बँकेच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, राजकीय अनिश्चितता वाढली असल्याचे म्हटले जात आहे.
तज्ज्ञांच्या मते सोन्यात अस्थिरता वाढू शकते. भारतात सणासुदीच्या मागणी आणि चलनविषयक धोरणात सुलभता येण्याच्या अपेक्षेमुळे दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक असला तरी, अल्पावधीत किमतीत तीव्र अस्थिरता दिसून येऊ शकते.