समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश उबाला हा नेव्हीत अग्नीवीर म्हणून कार्यरत होता. त्याने आपल्या भावाच्या मदतीने नेव्हीच्या हद्दीत शिरून इन्सास रायफल आणि तब्बल 40 काडतुसे चोरली. या शस्त्रांची विक्री करण्यासाठी दोन्ही भाऊ तेलंगणाच्या नक्षलवाद प्रभावित भागात गेले होते. तेथे नक्षलवाद्यांशी संपर्क साधून शस्त्रे विकण्याचा त्यांचा प्लान होता. मात्र गुन्हे शाखेने त्यांच्यावर कारवाई करत दोन्ही भावांना अटक केल आहे.
advertisement
सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न
या घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नेव्हीच्या हद्दीत कार्यरत असलेला जवानच अशा गंभीर गुन्ह्यात सामील झाल्याने सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सैन्यदलाकडून वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांची चोरी होऊन ती नक्षलवाद्यांच्या हाती पोहोचली असती तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे.
नक्षलवाद्यांशी नेमका कसा संपर्क साधला?
मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोन्ही भावांकडून कसून चौकशी सुरू केली आहे. त्यांचे आणखी कोणाशी संबंध आहेत का, पूर्वीपासून अशा प्रकारचे प्रयत्न झाले आहेत का, याबाबत तपास सुरू आहे. तसेच नक्षलवाद्यांशी नेमका कसा संपर्क साधला गेला आणि शस्त्रांची किंमत किती ठरवण्यात आली होती, याचीही चौकशी करण्यात येत आहे.
संभाव्य मोठा धोका टळला
या संपूर्ण प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट मोडवर काम सुरू केले आहे. नेव्हीत शिरून शस्त्रांची चोरी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. गुन्हे शाखेची ही कारवाई वेळेत झाल्याने संभाव्य मोठा धोका टळला आहे. एका सैनिकाच्या हातातून भरलेली रायफल चोरीला जाणे ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. सध्याच्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांना गांभीर्याने घेतले जात आहे. चोरलेला व्यक्ती नौदलाच्या वेशात असल्याने, ही घटना पूर्वनियोजित असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.