मुंबई :
6 डिसेंबरला दरवर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर राज्य आणि देशभरातील अनुयायी जमतात. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात पूर्वतयारी केली जाते. तसेच 5 डिसेंबरपासूनच वेगवेगळे पुस्तकांचे स्टॉल्स देखील असतात. यावर्षी देखील डॉ. बाबासाहेब यांना वंदन करण्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
advertisement
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच वाचनाला खूप जास्त प्रोत्साहन दिले आहे. 'वाचाल तर वाचाल' हे त्यांचे वाक्य आपल्याला अवगत आहे. नेहमी वाचनासाठी तत्पर रहा असे ते सर्वांनाच सांगत. वेगवेगळ्या अडीअडचणींवर मात करत बाबासाहेब यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. आपण शिकलो तर आपला समाज शिकेल असे ते वेळोवेळी म्हणत.
गावातून आणि खेड्यातून आलेली सर्वच मंडळी इथे वेगवेगळ्या पुस्तकांचे स्टॉल लावतात. तर काही मंडळी फोटो, प्रतिकृती अशा वेगवेगळ्या वस्तू इथे विकत असतात. एकंदरीतच महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक मंडळी आपल्याला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित अनेक वस्तू विकताना पाहायला मिळतात.
दादरच्या चैत्यभूमी परिसरात आपल्याला अनेक ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल पाहायला मिळतील. या स्टॉलवर बाबासाहेब यांचे विचार, त्यांचा इतिहास, त्यांचा प्रवास आणि अनुभव याविषयीची वेगळी पुस्तके आपल्याला विकत मिळतील. सध्या लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी 'बा भीमा' नावाचे कॉमिक बुक ऊर्वेला प्रकाशनने प्रकाशित केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेले पहिले वहिले मराठीतील कॉमिक असून या कॉमिकमध्ये त्यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
याशिवाय टाटा इंस्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी देखील येथे स्टॉल लावला आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आणि कोर्सची माहिती देण्याचे काम विद्यार्थी करतात. 5 डिसेंबरला लाखोंच्या संख्येने इथे उपस्थित झाले आहेत. तर अजूनही वेगवेगळ्या ठिकाणाहून अनुयायी आज रात्री दादरमध्ये दाखल होतील.