नेमके काय घडले?
चेंबूर येथे राहणारा हा तरुण बुधवारी त्याच्या मैत्रिणीसोबत ठाण्यातील एका लॉजमध्ये गेला होता. याची माहिती त्याच्या पत्नीला मिळताच, तिने थेट लॉजवर जाऊन पतीला रंगेहाथ पकडले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद झाल्यानंतर पत्नी तिथून निघून गेली. त्यानंतर, बुधवारी रात्री पतीने पत्नीला फोन करून "माझी चूक झाली, आता मी माझ्या आयुष्याचं काहीतरी बरंवाईट करणार आहे" असे बोलून फोन कट केला.
advertisement
पोलिसांची तत्काळ कारवाई
पतीचा फोन आल्यानंतर पत्नीने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्याचे लोकेशन शोधले. यावेळी तो ऐरोली खाडी पुलाजवळ असल्याचे लक्षात आले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना पुलावर एक रिक्षा उभी दिसली, जी त्या तरुणाचीच असल्याचे पत्नीने ओळखले.
रात्रीच्या अंधारामुळे त्याला शोधणे शक्य झाले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी तो खाडी पुलाच्या खाली एका खांबाला लागून असलेल्या सळईला धरून उभा असल्याचे दिसले. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने त्याची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेनंतर, पोलिसांनी त्या तरुणाला समुपदेशन केंद्रात पाठवले आहे, जेणेकरून त्याला योग्य मानसिक आधार मिळेल.