मुंबई : स्वतःचे घर असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यातल्या त्यात मुंबई आणि ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये आपल्या हक्काचे घर असावे, असे असे बहुतांश जणांना वाटते. परंतु सामान्यांना घराच्या किमती प्रचंड असल्यामुळे स्वतःच्या हक्काचे घर खरेदी करता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी म्हाडाकडून अल्प दरात घरांसाठी लॉटरी काढण्यात येत असते.
तुमचेही मुंबई आणि ठाण्यामध्ये घर असावे, अशी इच्छा असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, म्हाडाकडून मुंबई आणि ठाण्यातील घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (Mhada) मुंबईत सप्टेंबरमध्ये सुमारे 2 हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. या लॉटरीमध्ये गोरेगाव येथील गृह प्रकल्पातील पॉश घरांचादेखील समावेश असणार आहे. तर कोकण मंडळाकडून सुद्धा लॉटरी काढण्याची जय्यत तयारी सुरू आहे. कोकण मंडळाकडून 9 हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
advertisement
लॉटरी कधी निघणार?
कोकण मंडळाकडे एकूण 9000 घरे उपलब्ध आहेत. या घरांसाठी लॉटरीची जाहिरात लवकरच काढण्यात येणार आहे. येणाऱ्या काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाकडून लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लॉटरीसाठी कोण करु शकतात अर्ज?
ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत आहे ते ईडब्ल्यूएस श्रेणीअंतर्गत घरासाठी अर्ज करू शकतात. 6 ते 9 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना एलआयजी या प्रवर्गात अर्ज करता येईल. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 9 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंत आहे ते एमआयजी श्रेणीअंतर्गत तर, वार्षिक 12 लाख रुपयांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असलेल्यांसाठी एचआयजी श्रेणीअंतर्गत अर्ज करू शकतात.
लॉटरीच्या अर्जासाठी पती-पत्नीचे वार्षिक उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न मानले जाते. व्यक्तीचे आई-वडील किंवा भावंडांचे उत्पन्न हे कौटुंबिक उत्पन्न मानले जात नाही. या काही महत्त्वाच्या बाबी विचारात घेतल्या जातील.