ही नवीन सेवा ए-84 या क्रमांकाने धावणार असून रविवारपासून तिची सुरुवात होणार आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक (संग्रहालय) ते ओशिवरा बस आगार या दरम्यान ही बस धावेल. विशेष म्हणजे या मार्गात पारशी जनरल रुग्णालय, महालक्ष्मी मंदिर, नेहरू तारांगण, वरळी दुग्धालय अशा प्रमुख ठिकाणी थांबे ठेवण्यात आले आहेत. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) बांधकामाच्या सुरुवातीपासूनच बस आणि रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली होती. त्याचा लाभ आता प्रत्यक्ष प्रवाशांना मिळणार आहे.
advertisement
आत्तापर्यंत या मार्गावर दुचाकी, तीनचाकी, पादचारी आणि अवजड वाहनांना प्रवेश नव्हता. परिणामी कोस्टल रोडवरून प्रवास करण्यासाठी खासगी वाहन किंवा टॅक्सी हेच पर्याय उपलब्ध होते. मात्र, आता बेस्टची ही वातानुकूलित सेवा सुरू झाल्याने सामान्य प्रवाशांना देखील या मार्गाचा उपयोग करता येणार आहे.
या बससेवेचे भाडे किमान 15 रुपये तर कमाल 50 रुपये इतके ठेवण्यात आले आहे. ही सेवा आठवड्याचे सर्व दिवस कार्यरत राहील. यापूर्वी बेस्टने एनसीपीए ते भायखळा दरम्यान ए-78 या मार्गावर दमणिका सेवा सुरू केली होती. संपूर्ण कोस्टल रोड खुला झाल्यानंतर आता दुसरी नवी सेवा सुरू करण्यात आली आहे.
ए-84 बसमार्गामुळे दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील महत्त्वाचे भाग जलदगतीने जोडले जाणार आहेत. या बसमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक, अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट स्थानक), वरळी सी फेस, वरळी आगार, महापौर बंगला (शिवाजी पार्क), माहीम, खार स्थानक रोड (पश्चिम), सांताक्रूझ आगार, विलेपार्ले, अंधेरी स्थानक (पश्चिम), ओशिवरा पूल आणि ओशिवरा आगार अशा महत्त्वाच्या ठिकाणांना ही बस जोडेल.
ओशिवरा आगारहून पहिली बस सकाळी 7.15 वाजता सुटेल, तर शेवटची बस दुपारी 5.20 वाजता धावेल. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौकाहून पहिली बस सकाळी 8.50 वाजता सुटेल आणि शेवटची बस संध्याकाळी 7.15 वाजता असेल.
या उपक्रमामुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. कोस्टल रोडच्या वापरात आता मोठी वाढ होणार असून, मुंबईकरांसाठी ही सेवा नक्कीच दिलासा देणारी ठरणार आहे.