सध्या ठाणे-नवी मुंबईदरम्यानची वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी मोठा त्रास निर्माण करते. विमानाच्या वेळेला उशीर होण्याचा धोका नेहमीच असतो. या नव्या मार्गामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडी टाळता येईल आणि विमानतळावर पोहोचणे अधिक सुलभ होईल. तरीही या सोयीसोबत एक मोठा आर्थिक फटका प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. या मार्गावर कारधारकांना एकरी प्रवासासाठी 365 रुपये टोल मोजावा लागणार आहे आणि दरवर्षी टोलदर वाढीसाठी योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळात हा प्रवास आणखी महाग पडण्याची शक्यता आहे.
advertisement
या प्रकल्पासाठी 6 हजार 363 कोटी रुपयांचा निधी तयार केला आहे. त्यापैकी 80 टक्के सिडकोवर आणि राज्य सरकारकडून उर्वरित 20 टक्के केंद्र सरकारकडून उबलले जाणार आहे. सुरुवातीला ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी यांना काही आर्थिक भार उचलण्याचे सुचवण्यात आले होते, परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे हा प्रकल्प ''बांधा-वापरा-हस्तांतरित करा'' या तत्वावर राबविण्यात येणार आहे. प्रकल्प 2031 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतरच टोल वसुली सुरु होईल.
देशात मुंबई-पुणे दुतगती महामार्ग, समृद्धी महामार्गसारख्या प्रकल्पांवर टोल आकारला जातो. प्रारंभी टोल दर वाजवी वाटतो, मात्र कालांतराने दरवाढीमुळे प्रवाशांना अधिक खर्च करावा लागतो. ठाणे-नवी मुंबई विमानतळ मार्गाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
या नव्या मार्गामुळे प्रवाशांना वेळेची बचत होईल आणि विमानतळावर पोहोचणे अधिक सोयीचे होईल, परंतु टोलदरामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. वाहतूक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीने हा प्रकल्प ठाणेकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
या मार्गामुळे प्रवास सुलभ होईल, वाहतूक कोंडी कमी होईल, पण टोलदर आणि त्यातील वार्षिक वाढ ही प्रवाशांसाठी आव्हान राहणार आहे.