काय आहे पोलिसांच्या नोटीशीत?
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत विविध वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय वकिलाती व इतर वित्तीय केंद्रे कार्यरत आहेत. मुंबईत अंदाजे दररोज 60 ते 65 लाख नागरिक हे नोकरी निमित्ताने ट्रेन व इतर वाहतुकीच्या माध्यमाने प्रवास करत असतात. सकल मराठा समाज आंदोलक हे प्रचंड मोठ्या वाहन संख्येसह मुंबईत आल्यास त्याचा विपरीत परिणाम होईल आणि मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे.
advertisement
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे 7000 स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. त्याची क्षमता 5 ते 6 हजार आंदोलकांना सामावून घेण्याची आहे. तिथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात मुबलक जागा उपलब्ध होणार नाही. परिणामी, त्यांना त्या प्रमाणात सोईसुविधाही मिळणार नाहीत. तेथील उर्वरित मैदान क्रीडा विभागाच्या अख्यत्यारित असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक मैदान 3024/प्र.क. 12/2024/कीयुसे-1, दि. 24.01.2024 अन्वये तेथे आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
वाचा - लोणावळ्यातून मुंबईला निघणार की नाही? मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका
आपण लाखोंच्या संख्येने आंदोलक व वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, उपलब्ध नसलेले पर्यायी रस्ते, खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड व इतर अत्यावश्यक सेवांवर होणारा प्रभाव पाहता मुंबईतील एकूण सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे आपण वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे हे आंदोलन प्रचंड संख्येचे असून मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येच्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही. त्याचप्रमाणे सदरचे आंदोलन हे अनिश्चित कालीन असल्याने त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा दीर्घकाळासाठी मुंबईमध्ये पुरवणे शक्य होणार नाही. विशेषतः त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य व इतर नागरी सुविधांवरही होणार आहे. ज्याअर्थी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी आम्हांस आंदोलनासाठी योग्य जागा आपणांस कळविण्याबाबत सांगितले आहे.